राजस्थानातील १३ वर्षीय बालिकेवरील अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ महिला संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. महिला व बालिकांच्या सुरक्षेसाठी कडक पोलीस गस्त, सीसीटीव्ही, अवैध धंद्यांवर कारवाई आणि प्रभावी महिला हेल्पलाईनची मागणी.



"महिला सुरक्षिततेसाठी ठोस कृती करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा महिला संघटनांचा प्रशासनाला इशारा."

 एल्गार मराठी न्यूज 


धुळे | प्रतिनिधी

राजस्थानातील श्रीगंगानगर येथे १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर झालेल्या कथित सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध करत विविध महिला संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. महिलांवरील आणि बालिकांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, अशा प्रकारच्या घटना समाजमनाला हादरवणाऱ्या असून महिलांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला व बालकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हे प्रशासनाचे प्रमुख कर्तव्य असून, गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

यावेळी नरसापूर येथील एका प्रकरणात पोलिसांनी तत्परतेने तपास करून न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल प्रशासन व न्यायव्यवस्थेचे कौतुक करण्यात आले. त्याचवेळी राजस्थानातील घटनेसारख्या गंभीर घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली.

महिला संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे शहर व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, महिला वसतिगृहे, बसस्थानके आणि निर्जन भागात पोलिसांची नियमित गस्त वाढविणे, संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते नियंत्रण कक्षाशी जोडणे, महिलांच्या सुरक्षेला बाधा ठरणारे अवैध धंदे व टवाळखोरांचे अड्डे उद्ध्वस्त करणे, शाळा-महाविद्यालयांमध्ये सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, सायबर जागरूकता व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण आयोजित करणे, तसेच महिला हेल्पलाईन व 'निर्भया पथक' अधिक प्रभावीपणे कार्यरत ठेवून त्याचा व्यापक प्रसार करण्याची मागणी केली.

प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन ठोस कार्यवाही करावी, अन्यथा नागरिक व महिला संघटनांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

या निवेदनावर सुचेता शिनकर, माधुरी अमृतकर, मंगल पाटील, दीपाली मिस्तरी, मयुरी पाटील, रत्ना सपकाळ, मालती राठोड, मोहिनी धात्रक, रेणुका वागळे यांच्यासह विविध महिला प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या