एल्गार मराठी न्यूज
धुळे, दि. 10 जुलै : धुळे येथील राज्य परिवहन महामंडळातील काही अधिकाऱ्यांवर पदाचा गैरवापर व आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणे यांनी नाशिक येथील प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे-भजने आंदोलन केल्याची माहिती निवेदनाद्वारे दिली आहे.
बैसाणे यांनी विभागीय आयुक्त, नाशिक यांना दिलेल्या निवेदनात धुळे विभागातील काही अधिकाऱ्यांविरोधात यापूर्वी पुराव्यानिशी तक्रारी दाखल करण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र, त्या तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने 7 मे 2026 पासून धुळे येथील क्युमाईन क्लब परिसरात बेमुदत धरणे-भजने आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निवेदनानुसार, विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे यांनी मार्ग तपासणी पथकाच्या वाहनाचा वैयक्तिक वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे आणि प्रादेशिक व्यवस्थापक विजय गिते यांच्यावरही पदाचा गैरवापर व आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला आहे. धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजनेअंतर्गत निविदा प्रक्रिया न राबविता निधी खर्च करण्यात आल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या प्रकरणात यापूर्वी 24 मे रोजी धुळे बसस्थानकासमोर रास्ता रोको, 8 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न आणि 29 जून रोजी संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रतिमांचे दहन अशा विविध आंदोलनांद्वारे न्यायाची मागणी करण्यात आल्याचे बैसाणे यांनी नमूद केले आहे. मात्र, तरीही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर 9 जुलै रोजी नाशिक येथील प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाबाहेर संबंधित अधिकाऱ्यांच्या छायाचित्रांसह घोषणाबाजी करत एकदिवसीय धरणे-भजने आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, या सर्व आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडूनही या निवेदनावरील अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही.

0 टिप्पण्या