धुळ्यातील अल्पवयीन जानवी ठाकरे मृत्यूप्रकरणी कठोर कारवाईची मागणी; फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची मागणी

 


महाराष्ट्र परिट सेवा मंडळ व धोबी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; निष्पक्ष तपास, कठोर कारवाई आणि पीडित कुटुंबाला तातडीने न्याय देण्याची मागणी


एल्गार मराठी न्यूज | धुळे | प्रतिनिधी 


धुळे शहरातील गोळीबार टेकडी परिसरातील १५ वर्षीय जानवी जितेंद्र ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या प्रकरणाचा खटला विशेष जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र परिट सेवा मंडळ व धोबी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी, धुळे यांना शुक्रवारी दि. १० जुलै निवेदनाद्वारे करण्यात आली.


निवेदनात म्हटले आहे की, अल्पवयीन जानवी ठाकरे हिचा सातत्याने मानसिक छळ झाल्याचा आरोप असून, त्यातून तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, संबंधित प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल व जलद तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


निवेदनानुसार, घटना समजल्यानंतर समाजाचे कार्यकर्ते संजय वाल्हे व दीपक वाघ यांनी पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली. तसेच मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, केवळ अटक करून प्रकरण संपविण्याऐवजी संपूर्ण तपास जलदगतीने पूर्ण करून न्यायालयीन प्रक्रिया वेगाने राबविण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



समाजाच्या वतीने दोषींवर कठोर कायदेशीर कलमांखाली गुन्हे दाखल करावेत, तपासात कोणताही हलगर्जीपणा होऊ नये, तसेच पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हा खटला विशेष जलदगती न्यायालयात वर्ग करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.


निवेदनात पुढे म्हटले आहे की, हा लढा केवळ एका कुटुंबासाठी नसून समाजातील प्रत्येक मुलीच्या सन्मान आणि सुरक्षिततेशी संबंधित आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


या निवेदनावर बापू जगदाळे, संजय शरद वाल्हे, सुनील बाबा सपकाळ, अनिल मदन काकुळदे, ॲड. योगेश जी. खैरनार, जितेंद्र पवार, भोलाभाऊ सगरे, कृष्णा शिंदे, अमोल गायकवाड, संजय गवळी, गुलाब सोनवणे, शैलेश पवार, एकनाथ बोरसे, अरुण धोबी, दीपक कपडे, अरुण सूर्यवंशी, मधुकर ठाकरे, सुभाष ठाकरे, संजय ठाकरे, अनिल ठाकरे, योगेश ठाकरे, प्रशांत बच्छाव, वाल्मीक वाघ, विलास ठाकरे, सचिन चव्हाण, पंडित जगदाळे, भूपेंद्र खैरनार, गणेश परदेशी, भगवान वाघ, आबा सपकाळ, पुंडलिक चव्हाण, गणेश आगलावे, अप्पासाहेब शिंदे, तेजस ठाकरे, मयुर ठाकरे, कल्पेश ठाकरे, राजेंद्र ठाकरे, दीपक खैरनार, सुनंदा वाघ, प्रमिलाबाई ठाकरे, मंगलाबाई खैरनार, लताबाई पवार, चतुरा आगलावे, रोहिणी ठाकरे, काजल शिंदे, मीराबाई गवळी, अलका ठाकरे, मालती ठाकरे, वंदना खैरनार, शकुंतला सोनार, छाया मोरे, रुपाली ठाकरे, कविता गवारे, पूजा शिंदे, सोनल चव्हाण, उर्वी ठाकरे, नेहा ठाकरे, पूजा काकुळदे यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून, निवेदनातील आरोप हे निवेदनकर्त्यांचे म्हणणे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या