उषाताई साठे हत्या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी; भारतीय संविधान सेनेचे निवेदन



एल्गार मराठी 

एसआयटी चौकशी, जलदगती न्यायालयात खटला, आरोपीची मालमत्ता जप्ती, पीडित कुटुंबाला ५० लाखांची मदत व पोलीस संरक्षणाची भारतीय संविधान सेनेची मागणी

धुळे |प्रतिनिधी :दि. ९ जुलै : भारतीय संविधान सेना (स्थापनाधीन संविधाननिष्ठ सामाजिक जनआंदोलन) या संघटनेने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी (मूळ गाव माळखांबी) येथे झालेल्या मातंग समाजातील महिला मजूर कै. उषाताई साठे यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी सचिन देशमुख व त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.


संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद साहेबराव लोंढे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, सोलापूर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन पाठवून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, कै. उषाताई साठे या अत्यंत गरीब व कष्टकरी महिला मजूर होत्या. आरोपी सचिन देशमुख याने जातीच्या, पैशाच्या आणि सावकारीच्या बळावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना केवळ वैयक्तिक वाद नसून अनुसूचित जातीवरील नियोजित जातीवादी हल्ला असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.


संघटनेच्या प्रमुख मागण्या


- या प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी.

- आरोपीने वापरलेले बेकायदेशीर शस्त्र कुठून आले याचा तपास करावा.

- आरोपीला राजकीय किंवा सामाजिक वरदहस्त आहे का, याची चौकशी करावी.

- खटला जलदगती न्यायालयात चालवून लवकर निकाल द्यावा.

- शासनाने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी.

- आरोपीची अवैध सावकारी व मालमत्तेची चौकशी करून आवश्यक ती जप्तीची कारवाई करावी.

- अॅट्रॉसिटी कायद्यानुसार आर्थिक मदत तात्काळ द्यावी.

- पीडित कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत, ५ एकर शेतजमीन आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी.

- साठे कुटुंबाला २४ तास पोलीस संरक्षण द्यावे.


संघटनेने स्थानिक लोकप्रतिनिधींनी अद्याप कुटुंबाची साधी विचारपूसही न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, शासनाने तात्काळ कारवाई न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र न्याय हक्क आंदोलन छेडण्याचा इशाराही भारतीय संविधान सेनेने दिला आहे.


निवेदनावर आनंद लोंढे यांच्यासह आबा अमृतसागर, इंजि. रवि पवार, राजेंद्र भामरे, बी. आर. हाके, प्रशांत थोरात आणि गोपाल शिरसाठ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; ९ जुलै रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन!

एमआयएमची धुळे शहर व जिल्हा कार्यकारिणी घोषित; सोशल इंजिनिअरिंगवर भर

धुळे शहराला लाभले आदिशक्ती श्री चामुंडामातेचे भव्य मंदिर; प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न