Type Here to Get Search Results !

एल्गार मराठी न्यूज

एल्गार मराठी न्यूज

शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; ९ जुलै रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन!


प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाचा इशारा

एल्गार मराठी न्यूज 

धुळे प्रतिनिधी : 

धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाला निवेदन सादर करत ९ जुलै २०२६ रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी, धुळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
समितीच्या निवेदनानुसार, पदोन्नती प्रक्रियेत होत असलेला विलंब तातडीने दूर करून प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, कार्यरत सेवाज्येष्ठ शिक्षकांना TET पात्रतेत शिथिलता देण्यात यावी किंवा अनुभवाच्या आधारे समकक्ष पात्रता देण्याचा निर्णय घ्यावा, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत पदोन्नतीस पात्र शिक्षकांना संधी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, शाळा संलग्नीकरण धोरणामुळे ग्रामीण भागातील शाळांचे अस्तित्व धोक्यात येत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याने हे धोरण तात्काळ रद्द करावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या स्पष्ट सूचनांनुसार अन्य शासकीय कर्मचारी उपलब्ध नसतील तेव्हाच शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती करावी, असे असतानाही प्राथमिक शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात अशैक्षणिक कामांचा बोजा टाकला जात असल्याची खंत समितीने व्यक्त केली आहे. त्यामुळे शिक्षकांवर मानसिक व शारीरिक ताण वाढत असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावरही परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने शिक्षकांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने दिला आहे. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस शासन प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या वेळी जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक, सरचिटणीस चंद्रकांत सत्यसा, मागासवर्गीय संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवानंद बैसाणे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील, शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष बापू पारधी, मागासवर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, पदवीधर संघटनेचे सरचिटणीस भटू पाटील, कार्याध्यक्ष रा.का पाटील, पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ सोमवंशी, मागासवर्गीय संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र पिंपळे, आदी शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments