Type Here to Get Search Results !

एल्गार मराठी न्यूज

एल्गार मराठी न्यूज

धुळे शहराला लाभले आदिशक्ती श्री चामुंडामातेचे भव्य मंदिर; प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

धुळे शहराला लाभले आदिशक्ती श्री चामुंडामातेचे भव्य मंदिर; प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न 


एल्गार मराठी न्यूज 


धुळे, प्रतिनिधी : धुळे शहरातील देवपूर परिसरातील पांझरा नदीकाठी, हत्ती डोहाजवळील चामुंडामाता नगर येथे उभारण्यात आलेल्या आदिशक्ती कुलस्वामिनी श्री चामुंडामाता मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे गुरुवार (दि. २) ते रविवार (दि. ५ जुलै २०२६) या कालावधीत अत्यंत भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. श्री चामुंडामाता धर्मादाय ट्रस्ट, धुळे यांच्या वतीने आयोजित या चारदिवसीय धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
ट्रस्टचे अध्यक्ष श्री. पंढरीनाथ राजाराम बडगुजर यांच्या संकल्पनेतून तसेच त्यांनी मंदिरासाठी स्वतःच्या मालकीची जागा दान दिल्यानंतर हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. धुळे शहरात प्रथमच आदिशक्ती श्री चामुंडामातेचे भव्य मंदिर साकार झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोहळ्याची सुरुवात गुरुवारी सकाळी वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक (स्वस्तिक सिनेमा) येथून निघालेल्या भव्य कलश शोभायात्रेने झाली. त्यानंतर तीन दिवस वेदमंत्रांच्या गजरात विविध धार्मिक विधी, वास्तु पूजन, योगिनी मंडल पूजन, जलाधिवास, नवग्रह व रुद्रपूजन, विविध हवन, शय्याधिवास, धान्याधिवास, देवतास्थापना, पूर्णाहुती व महाआरती असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
रविवारी (दि. ५ जुलै) वेदमूर्ती श्री. पुष्कर महेंद्र दीक्षित गुरुजी व सहकारी ब्रह्मवृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत वैदिक विधीनुसार श्री चामुंडामाता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर भाविकांना आशीर्वाद देण्यात आले आणि दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यास पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयकुमार रावल, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
धार्मिक क्षेत्रातील प.पू. ह.भ.प. प्रसाद महाराज, प.पू. आनंदजीवन स्वामी, प.पू. खगेंद्र महाराज, सद्गुरू डॉ. मुकुंदराज महाराज, प.पू. भाऊमहाराज रुद्र, स्वामी महंत राहुल गिरी (लाल बापू), श्री. चंद्रकांत गुरव आदी संत-महंतांनी भाविकांना आशीर्वाद दिला.
सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संस्था तसेच बडगुजर समाजातील पदाधिकारी, महिला मंडळ, युवक मंडळ आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री चामुंडामाता धर्मादाय ट्रस्टचे अध्यक्ष श्री. पंढरीनाथ राजाराम बडगुजर, उपाध्यक्ष, विश्वस्त, महिला मंडळ, युवक मंडळ, स्वयंसेवक तसेच समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments