एल्गार मराठी न्यूज
धुळे, प्रतिनिधी : बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या निर्देशानुसार ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाची धुळे शहर व धुळे जिल्ह्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत रियाज अली शेख यांची जिल्हाध्यक्ष, शोएब अन्सारी यांची शहराध्यक्ष, तर सोशल इंजिनिअरिंगचा भाग म्हणून सनी संजय वाडेकर यांची जिल्हा युवा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्त्यांमुळे एमआयएम हा सर्वधर्म समभावाची भूमिका स्वीकारणारा तसेच जात-पात न मानता सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देणारा पक्ष असल्याचे स्पष्ट होते, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. नव्याने नियुक्त करण्यात आलेले सर्व पदाधिकारी पक्ष कार्यालयात नियमित उपलब्ध राहून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहतील, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
धुळे शहरातील नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पक्षाचे ११ नगरसेवक नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसोबत समन्वयाने काम करतील. शहराच्या विकासाबाबत तसेच सामाजिक क्षेत्रातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पक्षाकडून शंभर टक्के प्रयत्न केले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी पक्षाचे नेते इर्शादभाई जहागिरदार यांनी महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी लवकरच उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली. न्यायालयाचा निर्णय पक्षाच्या बाजूने लागल्यास विरोधी पक्षनेतेपदाचा उपयोग धुळे शहरातील जनतेच्या विकासासाठी व त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
लवकरच संपूर्ण धुळे जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचेही जहागिरदार यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या १० तारखेपासून सुरू होणाऱ्या Special Intensive Revision (SIR) मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेचा प्रत्येक धुळेकर नागरिकाने लाभ घ्यावा आणि मतदार यादीत आपले नाव समाविष्ट किंवा अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
चाळीसगाव रोड वरील पक्षाच्या मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी इर्शादभाई जहागिरदार, गटनेते अब्दुल लतीफ (लल्लू शेठ), नगरसेवक अमीर पठाण, शब्बीर मन्सुरी तसेच एमआयएम पक्षाचे महिला व पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या