धुळ्यात युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार नाटकाला विरोध; पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले

 


एल्गार मराठी न्यूज
 

धुळे प्रतिनिधी: दि. 5 जुलै 2026 : धुळे शहरातील हिरे भवन येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' या नाटकाच्या प्रयोगास भारतीय संविधान सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत विरोध केला. नाटकाचा प्रयोग बंद पाडण्याचा प्रयत्न करत आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले.

यापूर्वी, दि. 4 जुलै 2026 रोजी भारतीय संविधान सेनेच्या वतीने धुळे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ लावण्यात आलेले 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' नाटकाचे माहिती फलक फाडण्यात आले होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि संबंधित नाटकाचा निषेध करत हे नाटक धुळ्यात होऊ देणार नसल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला होता.

त्या पार्श्वभूमीवर रविवारी नाटकाचा प्रयोग सुरू होण्यापूर्वी भारतीय संविधान सेनेचे अध्यक्ष आनंद लोंढे, आबासाहेब अमृत सागर, रवी पवार, भाऊसाहेब बळसाने यांच्यासह कार्यकर्त्यांनी हिरे भवन परिसरात आंदोलन केले. आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत नाटकाविरोधात घोषणाबाजी केली तसेच "मुर्दाबाद"च्या घोषणाही दिल्या. नाटकाचा प्रयोग बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

घटनेची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने हिरे भवन परिसरात आधीपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलन सुरू होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करून निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि नंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, या घटनेमुळे हिरे भवन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; ९ जुलै रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन!

एमआयएमची धुळे शहर व जिल्हा कार्यकारिणी घोषित; सोशल इंजिनिअरिंगवर भर

धुळे शहराला लाभले आदिशक्ती श्री चामुंडामातेचे भव्य मंदिर; प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न