१६व्या वर्षापासून शिवसेनेत सक्रिय असलेल्या अरुण कोळी यांच्यावर पक्षाने टाकला विश्वास
एल्गार मराठी न्यूज
मुंबई | शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी पंढरपूर येथील शिवसैनिक अरुण कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली.
शिवसेनेचे मुख्य सचिव संजय मोरे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि प्रशांत पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. डॉ. पी. बी. कुंभार यांच्या नेतृत्वाखाली व स्वाक्षरीने अरुण कोळी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी विभागाचे सचिव रविंद्र होळकर, परभणी जिल्हाध्यक्ष मदन रेनगडे, प्रसाद कोळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पंढरपूर येथील रहिवासी अरुण कोळी हे वयाच्या अवघ्या १६व्या वर्षापासून शिवसेनेत सक्रिय असून त्यांनी पक्षासाठी तसेच सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या राजकीय व सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीपत्रात शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा सक्रिय प्रचार-प्रसार करण्यासह पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन कार्य करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या नियुक्तीनंतर राज्य संपर्क प्रमुख अनिल धमने पाटील, सोशल मीडिया राज्यप्रमुख संजय कुसळकर यांच्यासह शिवसेनेतील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अरुण कोळी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या