हरित धुळेच्या दिशेने आणखी एक पाऊल; पत्रकार संघाने कृतीतून दाखवला पर्यावरणाचा आदर्श.
हरित धुळे अभियानाला पत्रकार संघाचा हरित हातभार!
एल्गार मराठी न्यूज धुळे, प्रतिनिधी|
दि. ११ जुलै : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी (दि. ११) वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. साक्री रोडवरील आयकर भवनाच्या पाठीमागे असलेल्या धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृह परिसरात पहिल्या टप्प्यात सुमारे १०० ते १५० मोठ्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
धुळे महानगरपालिकेच्या 'हरित धुळे कृती संघ' या उपक्रमांतर्गत विविध सामाजिक संस्था व नागरिकांना वृक्षारोपणासाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने दिलेले आश्वासन प्रत्यक्ष कृतीत उतरवले. या उपक्रमातून समाजासमोर पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण करत प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्हावे, असा संदेश देण्यात आला.
प्रसंगी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष मनोज गर्दे यांनी धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी पत्रकार संघाच्या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, शहरातील वाढते तापमान नियंत्रित करण्यासाठी वृक्षारोपण हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. हरित धुळे अभियान यशस्वी करण्यासाठी सामाजिक संस्था, नागरिक आणि विविध संघटनांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच त्यांनी पत्रकार संघाचे आभार व्यक्त करत प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, कार्याध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष रवींद्र नगराळे, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, कोषाध्यक्ष तुषार बाफना, मुंबई प्रांतिक सदस्य प्रकाश शिरसाट, कार्यालयीन अधीक्षक सुभाष वाघ, नगरसेवक अमोल (बंटी) मासुळे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सोनार, मनोहर सोलंकी, निलेश भंडारी, पुरुषोत्तम गरुड, विरेंद्र मोरे, राकेश गाळणकर, धनंजय दीक्षित, शांताराम अहिरे, भास्कर फुलपगारे, रूपक बिरारी, गोरख गर्दे, संजय पाटील, धनंजय गाळणकर, सनी सोनवणे, संदीप त्रिभुवन, सोपान देसले, दीपक शिंदे, पुरुषोत्तम पाटील, शरद वेंदे, अजिंक्य देवरे यांच्यासह पत्रकार, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी लावण्यात आलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेतल्यास 'हरित धुळे' हे स्वप्न निश्चितच साकार होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

0 टिप्पण्या