डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक स्मृतींना अभिवादन करत संविधान, समता व बौद्ध धम्माचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प!
एल्गार मराठी न्यूज
जळगाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक स्मृतींना अभिवादन करत सामाजिक समता, बंधुता, बौद्ध धम्म आणि भारतीय संविधानातील मूल्यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भंते नागसेन सातपुडा पर्वत यांच्या नेतृत्वाखाली जळगाव ते धुळे (लांडोर बंगला) 'भीमस्मृती धम्म पदयात्रे'चे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा दि. २१ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत पायी प्रवास करणार आहे.
दि. २१ जुलै रोजी सकाळी ८ वाजता जळगाव येथील घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रेल्वे स्थानक परिसरातून पदयात्रेला प्रारंभ होईल. दहा दिवसांचा प्रवास पूर्ण करून दि. ३१ जुलै रोजी धुळे येथील लांडोर बंगला येथे पदयात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.
या पदयात्रेला पूज्य गुरूजी ज्ञानज्योती महाथेरो (ताडोबा अभयारण्य, चंद्रपूर) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच देशभरातील अनेक मान्यवर भिक्खू संघ सहभागी होणार असून, त्यामध्ये भंते प्रियबोधी, भंते चारधम्मो, भंते सुगंध बोधी, भंते सागर बोधी, भंते धम्मज्योती, भंते आनंद, भंते धम्मरत्न, भंते संघरक्षित, भंते आर्यनाग आणि भंते सुमित बोधी यांचा समावेश आहे. याशिवाय देशभरातील मोठ्या संख्येने बुद्ध अनुयायी, उपासक-उपासिका आणि भीमसैनिकही या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३१ जुलै १९३७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्यायालयीन कामकाजानिमित्त वाघाडी (ता. शिरपूर, जि. धुळे) येथे आले होते. त्यावेळी त्यांनी लांडोर बंगला येथे मुक्काम केला होता. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृती जागविण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या समतावादी विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
पदयात्रेदरम्यान विविध गावांमध्ये मुक्काम, धम्मवंदना, प्रबोधनपर कार्यक्रम, संविधान जागृती, सामाजिक समतेचा संदेश तसेच बौद्ध धम्मावरील मार्गदर्शनपर उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. विशेषतः ग्रामीण भागात सामाजिक परिवर्तन, बंधुता आणि संविधान मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे.
खान्देशात प्रथमच इतक्या व्यापक स्वरूपात आयोजित होत असलेल्या 'भीमस्मृती धम्म पदयात्रे'त उपासक-उपासिका, भीमसैनिक तसेच सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन भंते नागसेन सातपुडा पर्वत यांनी केले आहे.
या ऐतिहासिक पदयात्रेचा समारोप दि. ३१ जुलै रोजी धुळे येथील लांडोर बंगला परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन करून करण्यात येणार असून, ही पदयात्रा खानदेशातील सामाजिक, धार्मिक आणि प्रबोधनपर चळवळीला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

0 टिप्पण्या