एल्गार मराठी न्यूज
अहिल्यानगर| दि. १२ जुलै : विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने "नवसमाजमाध्यमे, संवाद आणि सर्जनशीलता" या विषयावर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिर ११ व १२ जुलै रोजी अहिल्यानगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. नवमाध्यमांचा सामाजिक परिवर्तनासाठी प्रभावी वापर, संवाद कौशल्य आणि सर्जनशील अभिव्यक्ती या विषयांवर या शिबिरात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन मुक्ता कदम यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी कॉ. सिद्धार्थ जगदेव होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर, कॉ. धनाजी गुरव, लोकशाहीर संभाजी भगत, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले आणि रवींद्र पोखरकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
दोन दिवस चाललेल्या या शिबिरात सामाजिक चळवळी आणि नवसमाजमाध्यमे यांचे परस्परसंबंध, डिजिटल माध्यमांद्वारे प्रभावी जनसंवाद, सर्जनशील लेखन, सांस्कृतिक चळवळींची दिशा तसेच समकालीन सामाजिक प्रश्नांवर विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी चर्चासत्रे, संवाद आणि विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या शिबिरात सत्यशोधकांच्या वतीने राम शृंगारे, प्रा. श्रीकांत काळोखे, हर्ष मोरे, राज वाघ आणि ध्रुव काळोखे यांनी सहभाग घेतला. विविध विषयांवरील चर्चांमध्ये सहभागी होत त्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी नवमाध्यमांचा प्रभावी वापर करण्याचा संकल्प व्यक्त केला.

0 टिप्पण्या