विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने, सामाजिक परिवर्तन व संघटन बळकटीसाठी मार्गदर्शन; तालुका कार्यकारिणीची घोषणा
एल्गार मराठी न्यूज
शिरपूर | प्रतिनिधी: सत्यशोधक विद्यार्थी संघटना, शिरपूर यांच्या वतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आज शिरपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. सामाजिक परिवर्तनाची विचारधारा बळकट करणे, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे आणि समकालीन शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे हा शिबिराचा प्रमुख उद्देश होता.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी मा. रविंद्र विज्ञान महिराव हे होते, तर उद्घाटन मा. कमलताई युवराज ठोंबरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मा. जी. के. मंगळे, ॲड. युवराज ठोंबरे, मा. जे. डी. कुंवर, मा. बापूसाहेब इंदसे, मा. संध्या जगदेव, मा. बी. के. थोरात, मा. कल्पना ईशी, प्रा. डी. एल. पावरा, मा. नंदराज बेसणे व मा. दीपक कुंवर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात नावनोंदणीने झाली. त्यानंतर शाहीर प्रवीण पाणपाटील, शाहीर विजय अहिरे आणि शाहीर आनंद महाराज यांनी सादर केलेल्या क्रांतीगीतांनी उपस्थितांमध्ये परिवर्तनाची प्रेरणा जागवली. अध्यक्षीय मनोगतानंतर विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले.
पहिल्या सत्रात हेमंत धिवरे यांनी विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने या विषयावर शिष्यवृत्ती, पेपरफुटी, बेरोजगारी आदी गंभीर प्रश्नांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर कॉ. सिद्धांत बागुल (राज्याध्यक्ष, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र) यांनी संघटनेची भूमिका, ध्येय आणि सामाजिक परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांची जबाबदारी याविषयी सविस्तर विचार मांडले.
दुपारच्या सत्रात प्रा. प्रज्ञावंत बिऱ्हाडे यांनी सत्यशोधक विद्यार्थी संघटना : सांस्कृतिक लढे आणि आंदोलने या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या गटचर्चेत अनुसूचित जाती उपवर्गीकरण, नीट-जेईई परीक्षा व पेपरफुटी, विद्यार्थी आत्महत्या, लोकशाहीतील माध्यमांची भूमिका, वाढती महागाई, बेरोजगारी, जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचे प्रयत्न, शिक्षणाचे खाजगीकरण व ब्राह्मणीकरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
समारोपापूर्वी शाहीर प्रवीण पाणपाटील यांनी सत्यशोधक जागर कलामंचाची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर सत्यशोधक विद्यार्थी संघटना, शिरपूर तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
शिरपूर तालुका कार्यकारिणी
अध्यक्ष – विशाल लवा शिरसाठ
उपाध्यक्ष – अनिल संजय अहिरे
सचिव – जयंवत प्रकाश थोरात
संघटक – विकास साहेबराव साबळे
संघटक – हेमराज भास्कर सोनावणे
सदस्य – अविनाश विजय कापुरे
सदस्य – रोहित चावदस सुरवाडे
यावेळी कॉ. प्रवीण पाणपाटील यांनी सांगितले की, "आज सर्वदूर चळवळीचा तुटवडा जाणवत असताना सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून क्रांतिकारी लढ्याला तीव्र धार देण्याची गरज आहे." तसेच ॲड. युवराज ठोंबरे, माजी उपाध्यक्ष, वकील संघ यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना सध्याच्या सामाजिक, शैक्षणिक, शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांसमोरील गंभीर प्रश्नांवर संघटितपणे लढा उभारण्याचे आवाहन केले.
अखेर सहभागी कार्यकर्त्यांनी संघटनेची विचारधारा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संघटितपणे संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला.

0 टिप्पण्या