दोन वर्षांपासून बेपत्ता राहुल भदाणे तपास प्रकरणात निष्काळजीपणाचा आरोप; पोलीस अधीक्षक व गृहमंत्र्यांनी खुलासा करावा – पीडित वडिलांची मागणी

 


एल्गार मराठी न्यूज 


सीसीटीव्ही, लोकेशन आणि तपासातील कथित हलगर्जीपणावर सवाल; निष्पक्ष चौकशीची मागणी!

राहुलचा शोध घ्या, तपासाबाबत खुलासा करा' – पीडित कुटुंबाची सरकार आणि पोलिसांकडे आर्त हाक.


धुळे | प्रतिनिधी


दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या वारूड (ता. शिंदखेडा) येथील राहुल देविदास भदाणे यांच्या अपहरण प्रकरणाच्या तपासात गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप पीडित वडील देविदास भदाणे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन तपासातील कथित त्रुटी मांडल्या असून, पोलीस प्रशासनाने तातडीने प्रभावी कारवाई करून राहुलचा शोध घ्यावा, अशी मागणी केली आहे.


देविदास भदाणे यांनी सांगितले की, राहुल हा 11 जून 2024 रोजी सकाळी शिकवणीसाठी घरातून निघाल्यानंतर बेपत्ता झाला. त्याच दिवशी नरडाणा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 363 अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटूनही राहुलचा कोणताही ठोस मागमूस लागलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला.


त्यांच्या म्हणण्यानुसार, 13 जून 2024 रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये राहुल एका अनोळखी व्यक्तीसोबत दिसत होता. मात्र, हे महत्त्वाचे फुटेज पोलीसांनी पेनड्राइव्हमध्ये जतन न केल्याने ते हार्डडिस्कमधून नष्ट झाले आणि संशयित व्यक्तीचा शोध घेण्याची महत्त्वाची संधी गमावली गेली.


भदाणे यांनी तपासातील आणखी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. सुरुवातीला राहुलचे शेवटचे लोकेशन हरियाणातील करनाल असल्याचे सांगण्यात आले, तर नंतर पंजाबमधील लुधियाना हे शेवटचे लोकेशन असल्याची माहिती मिळाली. मात्र, त्या ठिकाणी प्रत्यक्ष तपासासाठी पथक पाठविण्यात आले नसल्याचा आरोप त्यांनी केला.


याशिवाय, राहुलने रेल्वेने प्रवास केला असण्याची शक्यता असतानाही भुसावळ, भोपाळ, दिल्ली, करनाल आणि लुधियाना येथील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात आले नाही. राहुलच्या वहीतील नोंदी आणि मोबाईलमधील संशयास्पद सर्च हिस्ट्रीचाही सखोल तपास झालेला नसल्याचा दावा त्यांनी केला.


या प्रकरणाचा तपास सध्या विशेष तपास पथक (SIT), स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि एटीएसमार्फत सुरू आहे. तसेच, या प्रकरणात माननीय उच्च न्यायालयानेही तपासाबाबत निर्देश दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.


देविदास भदाणे यांनी सांगितले की, त्यांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र, अपेक्षित गतीने तपास होत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


तपासातील कथित निष्काळजीपणाबाबत धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि राज्याचे गृहमंत्री यांनी सार्वजनिक खुलासा करावा. अन्यथा न्याय मिळविण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.


पीडित कुटुंबाने राहुलचा तातडीने शोध घेऊन माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार निष्पक्ष, प्रभावी आणि जलद तपास करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; ९ जुलै रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन!

एमआयएमची धुळे शहर व जिल्हा कार्यकारिणी घोषित; सोशल इंजिनिअरिंगवर भर

धुळे शहराला लाभले आदिशक्ती श्री चामुंडामातेचे भव्य मंदिर; प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न