दोंडाईचा येथील ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन



आरोपींवर कारवाईत विलंब का? प्रशासनाकडे भिल समाज विकास मंचाचा सवाल.

एल्गार मराठी न्यूज 

सत्य व निर्भीड बातम्यांचा एल्गार!


धुळे | प्रतिनिधी

दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटीच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून निष्पक्ष व जलदगतीने तपास पूर्ण करावा, अशी मागणी भिल समाज विकास मंच, शिंदखेडा (महाराष्ट्र राज्य)चे संस्थापक अध्यक्ष तथा शिंदखेडा नगरपरिषदेचे नगरसेवक दिपक दशरथ भिल (अहिरे) यांनी जिल्हाधिकारी, धुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, दोंडाईचा पोलीस ठाणे येथे FIR क्र. 0185/2026, दि. 15 जून 2026 अन्वये विजय शिवाजी मराठे, सचिन विजय मराठे, राहुल उर्फ विशाल विजय मराठे आणि महेंद्र शिंदे यांच्याविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या आरोपांप्रकरणी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब आणि इतर आवश्यक पुरावे तपास यंत्रणेकडे उपलब्ध असूनही गुन्हा दाखल होऊन बराच कालावधी लोटला तरी संबंधित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. आरोपी गावात मुक्तपणे फिरत असल्याने फिर्यादी, त्यांच्या कुटुंबीयांवर तसेच साक्षीदारांवर दबाव आणण्याची किंवा धमकावण्याची शक्यता असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निष्पक्ष, प्रभावी आणि तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुख्य मागण्या अशा :

FIR क्र. 0185/2026 मधील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.

प्रकरणाचा तपास जलदगतीने, निष्पक्षपणे व कायद्यानुसार पूर्ण करण्यात यावा.

फिर्यादी, त्यांच्या कुटुंबीयांना तसेच साक्षीदारांना आवश्यक पोलीस संरक्षण देण्यात यावे.

तपासातील विलंबाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक, धुळे तसेच National Commission for Scheduled Castes (NCSC) आणि National Commission for Scheduled Tribes (NCST), नवी दिल्ली यांनाही पाठविण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सदर निवेदनावर अशोक सोनवणे, नानभो सोनवणे, रामभो सोनवणे, महेंद्र मालचे, बापू ठाकरे, दिपक अहिरे आणि राज साळवे आदींच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या