महाराष्ट्रातील लाखो दिव्यांगांच्या हक्कांसाठी राज्यव्यापी आंदोलन; पेन्शन, आरोग्य, रोजगार, शिक्षण ते आरक्षण दिव्यांगांच्या ५५ मागण्यांसाठी राज्यव्यापी लढा शासनाकडून तातडीच्या निर्णयाची अपेक्षा
एल्गार मराठी न्यूज
धुळे प्रतिनिधी: भाजपा दिव्यांग विकास आघाडी, महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील दिव्यांग नागरिकांच्या हक्कांसाठी, रोजगार, शिक्षण, आरोग्य, स्वरोजगार आणि सक्षमीकरणासाठी "३६ जिल्हे – ९ महिने – ५५ मागण्या" हे राज्यव्यापी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे राज्यभरातील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना ५५ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती अभियानाचे प्रमुख अमोल देवाजी वाळके यांनी दिली.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साक्री रोड येथील आयकर भवनाच्या मागे असलेल्या पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या अभियानाचा उद्देश महाराष्ट्रातील लाखो दिव्यांग नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून त्यांना सन्मानाने व स्वावलंबी जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. यासाठी शासनाकडे दिव्यांगांसाठी मासिक पेन्शन वाढविणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आरोग्य विमा, मोफत उपचार, शिक्षण, स्वरोजगार, बस व रेल्वे प्रवास सवलत, घरकुल, कर्ज, क्रीडा, महिला कल्याण, सार्वजनिक ठिकाणे सुलभ करणे, स्वतंत्र दिव्यांग विकास महामंडळ स्थापन करणे, सर्व सरकारी कार्यालये दिव्यांगांसाठी सुलभ करणे, आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करणे यांसह एकूण ५५ महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांमध्ये दिव्यांगांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन, १५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा, ६ टक्के आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग सहायता केंद्र, ई-रिक्षा व स्कूटी वितरण योजना, वर्क फ्रॉम होम रोजगार, घरकुल योजनांमध्ये प्राधान्य, सार्वजनिक ठिकाणी मोफत व्हीलचेअर सुविधा, सुगम्य भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी तसेच RPWD Act 2016 ची कठोर अंमलबजावणी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
राज्य शासनाने या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन महाराष्ट्रातील लाखो दिव्यांग नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी अभियानाचे प्रमुख अमोल देवाजी वाळके यांनी केली. अमोल वाळके हे भाजपा दिव्यांग विकास आघाडी, महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी, दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच नागपूर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण समितीचे सदस्य आहेत.

0 टिप्पण्या