प्रस्तावित ८×७ फुटांच्या गाळ्यांवर व्यापाऱ्यांचा आक्षेप; व्यवहार्य आराखड्यासाठी गाळ्यांचा आकार वाढवून व्यापारी व तज्ज्ञांशी चर्चा करण्याची मागणी.
एल्गार मराठी न्यूज
धुळे | प्रतिनिधी | शब्दवेध धनंजय गाळनकर.
धुळे शहरातील ऐतिहासिक शिवाजी मार्केट व शंकर मार्केटच्या पुनर्विकासासाठी धुळे महानगरपालिकेने आधुनिक व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेतला असला, तरी प्रस्तावित ८×७ फुटांच्या व्यापारी गाळ्यांच्या आकारावरून व्यापारी व नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. इतक्या लहान जागेत व्यवसाय करणे व्यवहार्य नसल्याने आराखड्याचा फेरविचार करून व्यापाऱ्यांच्या गरजांनुसार गाळ्यांचा आकार वाढवावा, अशी मागणी पुढे येत आहे.
धुळे शहराच्या व्यापारी इतिहासात शिवाजी व शंकर मार्केटला महत्त्वाचे स्थान आहे. अनेक दशकांपासून हजारो व्यापारी आणि लाखो ग्राहक या बाजारपेठांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे पुनर्विकासाचे स्वागत होत असले, तरी तो व्यापाऱ्यांच्या हिताचा आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सध्याच्या प्रस्तावानुसार प्रत्येक गाळ्याचा आकार ८ बाय ७ फूट म्हणजे अवघा ५६ चौरस फूट आहे. या जागेत काउंटर, रॅक, मालाची मांडणी, व्यापाऱ्याची बसण्याची व्यवस्था आणि ग्राहकांसाठी आवश्यक जागा उपलब्ध होणे कठीण असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. विशेषतः कापड, किराणा, भांडी, स्टेशनरी यांसारख्या व्यवसायांसाठी ही जागा अपुरी ठरणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, गाळ्यांचा आकार लहान असल्याने अतिरिक्त माल साठवण्यासाठी स्वतंत्र गोदाम घ्यावे लागेल. त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भार वाढण्याबरोबरच वाहतूक खर्च आणि वेळेचाही अपव्यय होईल. तसेच ग्राहकांना दुकानाबाहेर उभे राहावे लागल्यास गर्दी, वाहतुकीची कोंडी आणि आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
अग्निसुरक्षेच्या दृष्टीनेही लहान गाळे आणि कोंदट रचना धोकादायक ठरू शकते. आग लागल्यास अग्निशमन दलाला प्रवेश मिळणे, माल बाहेर काढणे आणि ग्राहकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढणे कठीण होऊ शकते, अशीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटना, वास्तुविशारद, अग्निसुरक्षा तज्ज्ञ आणि नागरिकांशी सविस्तर चर्चा करून आराखड्यात आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी होत आहे. गाळ्यांचा आकार किमान १०×१० फूट, शक्य असल्यास १०×१२ किंवा १२×१२ फूट ठेवण्याचा विचार करावा. तसेच विविध व्यवसायांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या आकाराचे गाळे, पुरेशी हवा-प्रकाश व्यवस्था, माल साठवण आणि अग्निसुरक्षेच्या उपाययोजना यांचा समावेश करावा, अशी सूचनाही पुढे आली आहे.
सार्वजनिक निधीतून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा अंतिम आराखडा मंजूर करण्यापूर्वी नागरिकांच्या हरकती व सूचना मागवून लोकसहभागातून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. व्यापाऱ्यांच्या हिताचा, ग्राहकांसाठी सोयीस्कर आणि भविष्यातील गरजांचा विचार करणारा पुनर्विकास झाल्यास शिवाजी व शंकर मार्केटचा प्रकल्प धुळे शहरासाठी आदर्श ठरू शकतो, असे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


0 टिप्पण्या