१५ व १६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
एल्गार मराठी न्यूज
धुळे | प्रतिनिधी
विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र यांच्या वतीने "समाज माध्यम आणि शोषणमुक्तीच्या चळवळी" या विषयावर १५ व १६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराच्या पूर्वतयारीसाठी धुळे शहरातील कार्यकर्त्यांची बैठक मंगळवार, २१ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.
आजच्या वित्तभांडवलशाही आणि डिजिटल युगात माहिती, डेटा, समाजमाध्यमे, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि अल्गोरिदम यांचा समाज, लोकशाही आणि सार्वजनिक मतमतांतरे यांवर मोठा प्रभाव पडत आहे. समाजमाध्यमांचा विवेकपूर्ण वापर करून परिवर्तनवादी, लोकशाहीवादी आणि शोषणमुक्तीच्या चळवळी अधिक प्रभावीपणे कशा राबवता येतील, तसेच डिजिटल माध्यमांद्वारे सकारात्मक विचारांचा प्रसार आणि प्रभावी नॅरेटिव्ह कसे उभे करता येतील, यावर या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे.
या दोन दिवसीय शिबिरात ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर, निरंजन टकले, रवींद्र पोखरकर, अभ्यासक मुक्ता कदम, तसेच आनंद शितोळे, रिमा अमरापूरकर, हनुमंत पवार, चित्रपट दिग्दर्शक महेश बनसोडे आणि लोकशाहीर संभाजी भगत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरामध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, संवाद आणि प्रशिक्षण सत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी धुळे शहरातील कार्यकर्त्यांची बैठक मंगळवार, २१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता चंदननगर बुद्धविहार, धुळे येथे आयोजित करण्यात आली असून, परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजमाध्यमांमध्ये सक्रिय असलेल्या नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहून आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या बैठकीचे आवाहन सिद्धांत बागुल, हर्ष मोरे, केतन निकम, नीलिमा भामरे, मयुरी जाधव, श्वेता गवळे, निकिता गवळे, राज वाघ, दिनेश बैसाने, धनंजय जगताप, सिद्धार्थ बैसाने, राज पगारे, विश्वजीत वाघ, मनोज नगराळे, राकेश अहिरे, जितेंद्र अहिरे, संदीप बोरसे, महेंद्र शिंदे, दीपक बैसाने, अतुल बैसाने, मनीष दामोदर, अमोल शिरसाठ, विजय वाघ, सचिन बागुल, शरद वेंदे, जेतवन मोरे, धम्मदीप सावंत आणि अजय मोरे यांनी केले आहे.


0 टिप्पण्या