एल्गार मराठी न्यूज
धुळे | प्रतिनिधी
शिरपूर शहरातील एका गार्डनमध्ये मध्यप्रदेशातून आलेल्या पर्यटक कुटुंबावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणात शिरपूर पोलीस ठाण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पार्टी (धुळे महानगर)च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मध्यप्रदेशातील एक कुटुंब पर्यटनासाठी शिरपूर येथील गार्डनमध्ये आले असताना व्यवस्थापनाशी संबंधित काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी किरकोळ कारणावरून लोखंडी पाईप व इतर हत्यारांच्या साहाय्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत पुरुष, महिला आणि लहान मुलांनाही गंभीर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेचा समाजवादी पक्षाने तीव्र निषेध व्यक्त करत, पीडित पर्यटक कुटुंबाला न्याय मिळवून देण्याऐवजी शिरपूर पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच, गार्डन व्यवस्थापनाशी संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर मोक्का अंतर्गत कारवाई करून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालावा, अशीही मागणी समाजवादी पक्षाने केली आहे.
हे निवेदन समाजवादी पार्टीचे धुळे महानगर प्रमुख गुड्डूभाई (गुडू) काकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. यावेळी जमील मन्सुरी, ॲड. जुबेर शेख, जाकीर खान, निहाल अन्सारी, ॲड. इमरान शेख, अशपाक पिंजारी, रेहान शेख, अतिकुर रहमान, मोबीन अन्सारी, साबीर शेख, बुरहान शेख, नबाब खान आणि मोसिन शेख यांच्यासह समाजवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टीप: या वृत्तातील आरोप हे समाजवादी पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातील दाव्यांवर आधारित आहेत.


0 टिप्पण्या