प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर
एल्गार मराठी न्यूज
धुळे | प्रतिनिधी
दि. १६ जुलै. जिल्ह्यात जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून त्यांना गती द्यावी, तसेच प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करावा, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते (भा.प्र.से.) यांनी संबंधित विभागांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक गिरीषकुमार भोरे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सांगितले की, प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा जल जीवन मिशनचा मुख्य उद्देश आहे. यासाठी सुरू असलेली सर्व कामे निश्चित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक असून, तांत्रिक मंजुरीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. योजनांचा नियमित आढावा घेऊन अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावीत. ज्या योजनांची कामे पूर्ण झाली आहेत, त्यांची ट्रायल रन करून ग्रामपंचायतीकडून काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घ्यावे, असेही त्यांनी निर्देश दिले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना जल जीवन मिशनच्या कामांची नियमित पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. मंजूर कामांचे त्रयस्थ परीक्षण करण्यात यावे तसेच स्विच रूमची अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत जिल्ह्यातील जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

0 टिप्पण्या