वरुणराजाची कृपादृष्टी लाभावी यासाठी भजनसंध्या; ११ शेतकऱ्यांना गोदान, दुष्काळ निधीसाठी ११ लाखांचा धनादेश
एल्गार मराठी न्यूज
धुळे |भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, उद्योजक तसेच शिक्षण, सहकार, समाजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण क्षेत्रात योगदान देणारे ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ४ व ५ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमांसह श्री. अग्रवाल यांचा सन्मान करण्यात येणार असून, दोन्ही दिवस विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
याबाबतची माहिती शहराचे आमदार अनुप अग्रवाल आणि श्री. ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल अमृतमहोत्सव समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी अमृतमहोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.
४ ऑक्टोबरला भजनसंध्या
अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून बळीराजावर ओढवलेल्या दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि वरुणराजाची कृपादृष्टी लाभावी, यासाठी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मालेगाव रोडवरील खान्देश गोशाळेच्या मैदानावर भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, जळगावच्या खासदार स्मिता वाघ, धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार माधवी नाईक आदी मान्यवरांच्या हस्ते गोपूजन व दीपप्रज्वलन होईल.
यानंतर ‘मेरा भोला है भंडारी’ या लोकप्रिय भजनासाठी प्रसिद्ध असलेले गायक हंसराज रघुवंशी यांच्या सुमधुर आवाजात भक्तिमय भजनसंध्या रंगणार आहे. त्यानंतर नवी दिल्ली येथील प्रसिद्ध साधो बँडतर्फे भक्तिमय गीतगायनाचा कार्यक्रम होणार आहे.
५ ऑक्टोबरला अभीष्टचिंतन सोहळा
ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग टोलनाक्याजवळील टॉपलाइन रिसॉर्ट येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, दुग्धविकासमंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्य व ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, धुळ्याच्या महापौर मायादेवी परदेशी आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होईल. त्यानंतर ओमप्रकाश अग्रवाल यांच्या ७५ वर्षांच्या विविध क्षेत्रांतील कार्याचा आढावा घेणारी चित्रफीत प्रदर्शित करण्यात येईल. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अमृतमहोत्सव समितीतर्फे सन्मानपत्र देऊन श्री. अग्रवाल यांचा गौरव करण्यात येणार आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित दोन दिवसांच्या कार्यक्रमांना आमदार अमरिशभाई पटेल, मंगेश चव्हाण, नंदू महाजन, काशिराम पावरा, मंजुळा गावित, अनिल पाटील, राहुल ढिकले, राम भदाणे, राजूमामा भोळे, अमोल जावळे, राजेश पाडवी, दिलीप बोरसे, देवयानी फरांदे आदी आमदारांसह माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
११ शेतकऱ्यांना गोदान; दुष्काळ निधीसाठी ११ लाख
अमृतमहोत्सवानिमित्त कुठलीही आतषबाजी न करता सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. अग्रवाल कुटुंबीयांतर्फे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ११ शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी मदत व्हावी म्हणून गोदान करण्यात येणार आहे.
तसेच शासनाच्या दुष्काळ निधीसाठी श्री. ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल अमृतमहोत्सव समिती व अग्रवाल कुटुंबीयांतर्फे शासनाच्या प्रतिनिधींकडे ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहे. याशिवाय गरीब वस्त्यांमध्ये धान्य किटचे वाटपही करण्यात येणार आहे.
पुष्पगुच्छ, भेटवस्तूंऐवजी शैक्षणिक साहित्य देण्याचे आवाहन
अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त दोन दिवस होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पुष्पगुच्छ, फुलहार किंवा भेटवस्तू न आणता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विद्यार्थी पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य भेट म्हणून द्यावे, असे आवाहन अमृतमहोत्सव समिती आणि आमदार अनुप अग्रवाल यांनी केले आहे.


0 टिप्पण्या