महाविद्यालयीन परिसरातील जातीय भेदभाव, आरक्षणाबाबतचे गैरसमज आणि सामाजिक पूर्वग्रहांवर विद्यार्थ्यांशी संवाद
एल्गार मराठी न्यूज
धुळे | दि. २५
महाविद्यालयीन परिसरातील जातीय भेदभाव, सामाजिक पूर्वग्रह, आरक्षणाबाबतचे गैरसमज तसेच संविधानिक मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने सामाजिक आशय असलेला ‘जयंती २’ हा मराठी चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. हा उपक्रम मयुरी जाधव यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला.
‘जयंती २’ या चित्रपटातून सामाजिक पार्श्वभूमीमुळे एका आदिवासी विद्यार्थिनीला महाविद्यालयीन वातावरणात करावा लागणारा भेदभाव, त्यातून निर्माण होणारा संघर्ष आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारे गैरसमज यांचे चित्रण करण्यात आले आहे. चित्रपटातील पायल या आदिवासी विद्यार्थिनीला सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागतो. अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर तिच्यावरच निलंबनाची कारवाई केली जाते. त्यानंतर विद्यार्थी तिच्या समर्थनार्थ एकत्र येऊन निष्पक्ष चौकशीची मागणी करतात.
चित्रपटाच्या माध्यमातून आरक्षणाच्या प्रश्नावरही विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणण्यात आली. आरक्षणाचा संबंध केवळ आर्थिक परिस्थितीशी न जोडता सामाजिक मागासलेपणा, समान संधी, प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांच्या संदर्भात विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त करण्यात आले. आरक्षणाबाबत समाजमाध्यमे व सार्वजनिक चर्चेत प्रचलित असलेल्या विविध गैरसमजांवरही संवाद साधण्यात आला.
‘आरक्षण केवळ दहा वर्षांसाठी होते’ या गैरसमजाबाबत विद्यार्थ्यांना घटनात्मक तरतुदींच्या संदर्भात माहिती देण्यात आली. राजकीय प्रतिनिधित्वासाठीच्या आरक्षणाच्या तरतुदी आणि शिक्षण व सरकारी सेवांमधील आरक्षणाच्या तरतुदी यांतील फरक समजावून सांगण्यात आला. भारतीय संविधानातील अनुच्छेद १५(४) आणि १६(४) मधील तरतुदींच्या संदर्भात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक तसेच राज्यसेवांमध्ये अपुरे प्रतिनिधित्व असलेल्या मागास वर्गांसाठी करण्यात आलेल्या विशेष तरतुदींवर चर्चा करण्यात आली.
चित्रपटानंतर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक न्याय, समता, बंधुता, समान संधी, प्रतिनिधित्व आणि संविधानिक मूल्ये या विषयांवर विचारमंथन करण्यात आले. सामाजिक विषयांवरील कलाकृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे, चर्चा करणे आणि सामाजिक वास्तवाकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
या उपक्रमात आदित्य मोरे, आर्यन रामराजे, चिरंजीत मोरे, गौतमी वानखेडे, काव्या कोकणे, प्रसाद मोरे, विराज मोरे, वंश केदार, यश वानखेडे, अमोल नन्नवरे, मोहित मोरे, नागेश वानखेडे, दुर्गेश वानखेडे, शौर्य नेरकर, भावेश खैरनार, मनीष मोरे, सुहास रामराजे आणि अनिल केदार यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना चित्रपट दाखविण्यासाठी बौद्ध महासभेचे सदस्य सुहास रामराजे आणि अनिल केदार यांनी आर्थिक सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक विषयावरील चित्रपट पाहण्यासोबतच सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांवर विचार करण्याची संधी मिळाली.


0 टिप्पण्या