भाजप नेते विनोद तावडे यांच्यासह विविध मंत्रिमहोदयांची उपस्थिती; टॉपलाइन रिसॉर्टमध्ये मुख्य कार्यक्रम
एल्गार मराठी न्यूज
धुळे | दि. ५ ऑक्टोबर २०२६ : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल (ओपी शेट) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन व सन्मानपत्र प्रदानाचा मुख्य कार्यक्रम आज, सोमवार (दि. ५) सायंकाळी ६.३० वाजता मुंबई-आग्रा महामार्गावरील टॉपलाइन रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आला आहे.
श्री. ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल अमृतमहोत्सव समिती आणि शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ओमप्रकाश अग्रवाल यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
अमृतमहोत्सवानिमित्त रविवारपासून विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी गोपूजन तसेच दुष्काळग्रस्त ११ शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी मदत म्हणून ११ गायींचे दान करण्यात आले. तसेच दुष्काळ निधीसाठी अग्रवाल कुटुंबीयांतर्फे ११ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यानंतर प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी आणि साधो बँड यांच्या भजनसंध्येचा कार्यक्रम झाला.
तावडेंसह विविध नेत्यांची उपस्थिती
आज होणाऱ्या मुख्य कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार विनोद तावडे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, दुग्धविकासमंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, सार्वजनिक आरोग्य व ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
या मान्यवरांच्या हस्ते ओमप्रकाश अग्रवाल यांना अमृतमहोत्सव समितीतर्फे सन्मानपत्र प्रदान करून त्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
हे असतील प्रमुख मान्यवर
कार्यक्रमास आमदार अमरिशभाई पटेल, मंगेश चव्हाण, नंदकिशोर महाजन, काशिराम पावरा, मंजुळा गावित, अनिल पाटील, राहुल ढिकले, राम भदाणे, राजूमामा भोळे, अमोल जावळे, राजेश पाडवी, दिलीप बोरसे, देवयानी फरांदे, चंद्रकांत रघुवंशी, सीमा हिरे, तसेच माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, कुणाल पाटील, भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर आणि धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला नागरिक, कार्यकर्ते, हितचिंतक व शुभेच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अमृतमहोत्सव समिती व आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी केले आहे.

0 टिप्पण्या