कामगार नाका, मानखुर्दसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची मागणी; मंत्री प्रकाश आबिटकरांकडे निवेदन

 


अपघात व अचानक आजारपणाच्या प्रसंगी तातडीची मदत मिळावी म्हणून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदन

एल्गार मराठी न्यूज 

मुंबई | प्रतिनिधी

मानखुर्द येथील ‘कामगार नाका’ परिसरातील असंघटित कामगारांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी स्वतंत्र सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे राज्य संपर्क प्रमुख अनिल धमने पाटील, सोशल मीडिया राज्यप्रमुख संजय कुसळकर आणि ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांच्या पुढाकारातून १ सप्टेंबर रोजी मंत्रालयातील दालनात मंत्री आबिटकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मानखुर्द येथील ‘कामगार नाका’ परिसरात मोठ्या संख्येने बांधकाम मजूर आणि रोजंदारीवर काम करणारे असंघटित कामगार दररोज कामाच्या शोधात एकत्र येतात. कामाच्या ठिकाणी अपघात होणे, उंचावरून पडणे किंवा अचानक प्रकृती बिघडणे यांसारख्या आपत्कालीन घटना घडण्याची शक्यता असते.

आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक कामगारांना आपत्कालीन प्रसंगी खासगी वाहनाची सुविधा तातडीने उपलब्ध होत नाही. त्यामुळे वेळेत उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर कामगारांच्या आरोग्य सुरक्षेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘कामगार नाका’ मानखुर्द परिसरातील कामगारांसाठी विशेष रुग्णवाहिका विशेष अधिकारातून किंवा १०८ रुग्णवाहिका सेवेंतर्गत मंजूर करून संबंधित परिसरात अथवा जवळच्या शासकीय रुग्णालयात तैनात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ही सुविधा उपलब्ध झाल्यास परिसरातील शेकडो कष्टकरी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या