महापालिकेच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित; उर्वरित मागण्यांसाठी १० दिवसांची मुदत

 


भारतीय संविधान सेनेचा प्रशासनाला इशारा; १० दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास धरणे आंदोलनाची तयारी

एल्गार मराठी न्यूज 

धुळे : धुळे शहरातील विविध व्यावसायिक अतिक्रमणांसह नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित मागण्यांसाठी भारतीय संविधान सेनेच्या वतीने क्युमाईन क्लब येथील आंदोलन भूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण महापालिका प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. महापालिका प्रशासनाने जुन्या महानगरपालिकेच्या मागील बाजूस असलेले गेट सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले केले असून, उर्वरित मागण्यांवर पुढील पंधरा दिवसांत कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.


संतोष अमृतसागर, दावल वाघ आणि रवींद्र पवार यांच्यासह भारतीय संविधान सेनेचे प्रमुख आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते. आग्रा रोडवरील बेकायदेशीर व्यावसायिक अतिक्रमणांवर कारवाई करावी, जुन्या महानगरपालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेले गेट नागरिकांसाठी कायमस्वरूपी खुले करावे, क्युमाईन क्लब येथील आंदोलन भूमीवरील पाचकंदील येथून स्थलांतरित करण्यात आलेल्या फळ विक्रेत्यांच्या वाढीव पत्र्याच्या शेडबाबत कारवाई करावी, बाबासाहेब कोतवाल ट्रस्टच्या अतिक्रमित बांधकामाबाबत कार्यवाही करावी, तसेच आंदोलनस्थळी कायमस्वरूपी स्वच्छतागृह आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.


महापालिका प्रशासनाच्या वतीने उपोषणकर्त्यांना दिलेल्या लेखी पत्रात विविध मागण्यांवर सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली. बाबासाहेब कोतवाल ट्रस्टच्या बांधकामाबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार नोटीस बजावण्यात आल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. तसेच आंदोलन भूमीवरील वाढीव पत्र्याच्या शेडबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.


आग्रा रोडवरील अतिक्रमणाबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे, तर शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधात विशेष मोहीम राबविण्याची कार्यवाही सुरू असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. आंदोलनस्थळी पिण्याचे पाणी आणि महिलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.


दरम्यान, जुन्या महानगरपालिकेच्या मागील बाजूस असलेले गेट सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. ही प्रमुख मागणी पूर्ण झाल्याने तसेच प्रशासनाने उर्वरित मागण्यांवर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.


मात्र, उर्वरित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय संविधान सेनेने प्रशासनाला दहा दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास क्युमाईन क्लब आंदोलन भूमीवर प्रतीकात्मक स्वरूपात पत्र्याचे शेड उभारून पुन्हा धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा भारतीय संविधान सेनेचे प्रमुख आनंद लोंढे यांनी दिला. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.


महापालिका प्रशासनाच्या लेखी व मौखिक आश्वासनानंतर धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि धुळे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र माईनकर यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडविण्यात आले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या