शाळा वाचवा–शिक्षण वाचवा मंचा’चा निर्धार; २४ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने
एल्गार मराठी न्यूज
धुळे (विशेष प्रतिनिधी)
राज्यभरातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘शाळा वाचवा–शिक्षण वाचवा मंचा’च्या वतीने व्यापक आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या बेमुदत धरणे आंदोलनात धुळे जिल्ह्यातून तब्बल १ हजार पालक, विद्यार्थी आणि शिक्षक-सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा ठाम निर्धार राष्ट्र भाषा भवन येथे आयोजित संयुक्त बैठकीत करण्यात आला.
राष्ट्र भाषा भवन, धुळे येथे जिल्ह्यातील पालक, विद्यार्थी, सामाजिक आणि शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत केजी ते पीजी (KG to PG) पर्यंतच्या शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मंचाचे राज्य समन्वयक व निमंत्रक सिद्धार्थ जगदेव यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी व मागण्यांची सविस्तर भूमिका मांडली.
प्रमुख मागण्या आणि कृती कार्यक्रम
बैठकीत शिक्षण क्षेत्रातील खालील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली:
शासन निर्णय रद्द करा: १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा.
मोफत व समान शिक्षण: केजी ते पीजी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत, दर्जेदार आणि समान शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
खाजगीकरण व विलिनीकरण थांबवा: शाळांचे अनावश्यक विलिनीकरण थांबवून शिक्षणाचे खाजगीकरण त्वरित थांबवावे.
भरती व सुविधा: शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, शाळांना पुरेशा पायाभूत सुविधा व आवश्यक निधी पुरवावा.
अशैक्षणिक कामे व मोबाईल बंदी: शिक्षकांना शालेय वेळेत अशैक्षणिक कामे करण्याचे आदेश दिले जात असल्याने, त्या कालावधीत मोबाईल बंद ठेवण्याची परवानगी द्यावी.
या मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या बेमुदत धरणे आंदोलनात धुळ्यातून मोठा ताफा रवाना होणार आहे.
या बैठकीला शिक्षक संघटनेचे पदाधिकारी बापू पारधी, भुपेश वाघ, प्रा. भागवत पाटील, आबासाहेब पाटील, उदय तोरवणे, विनोद रोकडे, युसुफ पापा सर, व्ही. टी. गवळे, अशपाक खाटीक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी २४ सप्टेंबरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील निदर्शनांमध्ये आणि ५ ऑक्टोबरच्या मुंबईतील बेमुदत धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सिद्धार्थ जगदेव, हर्षल मोरे, प्रकाश पाटील, इम्रान खान, अमीन कुरेशी, नीलिमा भामरे, दामोदर पाटील, राजेश शिरुडे, कैलास अमृतकर, इस्माईल सर, नितीन पाटील, ललित ठाकूर, महेश्वर माळी, अजय माळी, मयुरी जाधव, केतन निकम आदींनी केले आहे.


0 टिप्पण्या