पालकमंत्र्यांच्या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप; संविधान सेनेचे जेल रोडवर आमरण उपोषण

 




प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन तीव्र; तीन दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र भूमिका घेण्याचा इशारा

एल्गार मराठी न्यूज 

धुळे : पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची प्रशासनाकडून अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करत भारतीय संविधान सेनाने धुळे शहरातील जेल रोड येथील आंदोलन भूमीवर आमरण व साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाचा मंगळवारी (८ सप्टेंबर) दुसरा दिवस असल्याचे संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.


धुळे शहरातील अतिक्रमणे, सार्वजनिक रस्त्यांवरील कथित नियमबाह्य बांधकामे तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत संघटनेने यापूर्वी प्रशासनाकडे निवेदने दिली होती. ९ ऑगस्ट रोजीच्या आंदोलनादरम्यान पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मध्यस्थी करून मागण्यांबाबत आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती, असा दावा संघटनेचे अध्यक्ष आनंद लोंढे यांनी केला आहे.


मात्र, आश्वासनानंतरही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये धुळे महापालिका इमारतीलगतच्या सार्वजनिक रस्त्यावरील कथित अनधिकृत बांधकामावर कारवाई करणे, जेल रोड आंदोलन भूमीवरील नियमबाह्य शेड हटविणे, जुन्या मनपा मागील गेटवरील अतिक्रमण हटवून रस्ता खुला करणे आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे यांचा समावेश आहे. तसेच जेल रोड आंदोलनस्थळी पिण्याचे पाणी व महिलांसाठी छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.


या आंदोलनात भारतीय संविधान सेनेचे प्रदेश प्रवक्ते संतोष पंढरीनाथ अमृतसागर आणि संविधान सैनिक दावल वाघ आमरण उपोषणाला बसले असून, अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते साखळी उपोषणात सहभागी झाल्याचे संघटनेने सांगितले.


दरम्यान, पुढील तीन दिवसांत मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनाबाबत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या