नगरसेवकांचा अधिकृत एकत्रित गट असल्याचा दावा; चुकीचा निर्णय झाल्यास पुन्हा न्यायालयात जाण्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा
एल्गार मराठी न्यूज
धुळे । महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या शहर विकास आघाडी गटाने या पदावर दावा केला आहे. दोन्ही पक्षांचे १३ नगरसेवक अधिकृतरीत्या एकत्रित गट म्हणून नोंदणीकृत असल्याने विरोधी पक्षनेतेपदासाठी आमचा दावा मजबूत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या पदासाठी नगरसेवक दीपक खोपडे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
आमदार मंजुळा गावित यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख तुळशीराम गावित, जिल्हाप्रमुख सतीश महाले, महानगरप्रमुख संजय वाल्हे, नगरसेवक दीपक बंटी भाऊ खोपडे, नगरसेवक शहाबाझ शहा, नगरसेवक धिरज कलंत्री, नगरसेविका मंगला ताई सोनवणे आदी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुका झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत व एकत्रित गट म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. महापौरांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागणीची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.
यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी नगरसेवक शहाबाझ शहा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली. या प्रकरणात खंडपीठाने चार आठवड्यांच्या आत गुणवत्तेच्या (मेरिटच्या) आधारे विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता महापालिका प्रशासन आणि महापौरांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
सोमवारी महापौरांची भेट
खंडपीठाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ सोमवारी महापौरांची भेट घेणार आहे. यावेळी १३ नगरसेवकांचा अधिकृत एकत्रित गट तसेच न्यायालयाच्या आदेशाची माहिती देत विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करण्यात येणार आहे. नगरसेवक दीपक खोपडे यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात यावे, अशी पक्षाची भूमिका असल्याचे जिल्हाप्रमुख तुळशीराम गावित आणि सतीश महाले यांनी स्पष्ट केले.
निर्णय चुकीचा झाल्यास पुन्हा न्यायालयात जाणार
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र नव्हे, तर एकत्रित गट असून आमच्याकडे १३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे महापालिकेतील संख्याबळ आणि अधिकृत गटनोंदणीच्या आधारे विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, महापौरांनी या मागणीवर चुकीचा अथवा वस्तुस्थितीला धरून नसलेला निर्णय घेतल्यास पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय महापालिकेच्या आगामी राजकारणात महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.


0 टिप्पण्या