मराठा समाजाच्या मागण्या तातडीने मान्य करा; अन्यथा धुळ्यात चक्का जामचा इशारा

 


लोकप्रतिनिधींनी आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा; ९ सप्टेंबरला रास्ता रोको, १२ सप्टेंबरला अंतरवाली सराटीकडे जाण्याचे आवाहन

एल्गार मराठी न्यूज 

धुळे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज, धुळे जिल्ह्याच्या वतीने सरकारला मागण्या तातडीने मान्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागण्यांवर ठोस अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करून चक्का जाम करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला.

मनोज जरांगे पाटील हे गेल्या दहा दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण करत असून, सरकारमधील काही मंत्री व नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा करून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा दावा सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, धुळे जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, आजी-माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, नगरसेवक-नगरसेविका तसेच विविध राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, तसेच मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन देऊन आगामी आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

९ सप्टेंबर २०२६ रोजी धुळे जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले. तसेच १२ सप्टेंबर रोजी धुळ्यातून अंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने समाजबांधव जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पुढील आंदोलनाची दिशा तसेच मुंबईकडे जाण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

धुळे शहरासह शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा, साक्री, पिंपळनेर आणि धुळे ग्रामीण भागातील मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासह शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या संधींसाठी हा लढा असल्याचे सांगत, समाजबांधवांनी घराबाहेर पडून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाज, धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या