‘ताराराणी’च्या दशकभराच्या सामाजिक कार्याला कृतज्ञतेची सलामी; अमृत महोत्सवी ज्येष्ठ महिलांचा विशेष सन्मान

 


सामाजिक प्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि सेवाभावी उपक्रमांचा दशकपूर्ती सोहळ्यात गौरव

एल्गार मराठी न्यूज 

वृत्त प्रतिनिधी – धनंजय गाळणकर

धुळे : सामाजिक प्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि सेवाभावी उपक्रमांची परंपरा जोपासणाऱ्या ताराराणी महिला ज्येष्ठ नागरिक संघाचा दशकपूर्ती सोहळा मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या सभागृहात उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. संघाच्या दहा वर्षांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेताना विविध उपक्रमांचा गौरव करण्यात आला. यावेळी ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ महिलांसह सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेस्कॉमच्या खानदेश विभागाचे अध्यक्ष अॅड. बापूसाहेब एम. एस. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश अॅड. बापूसाहेब जे. टी. देसले उपस्थित होते. यावेळी डॉ. नानासाहेब वाघ, डॉ. शशिकला वाघ, प्रा. उषाताई पाटील, सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ. शशिकला पवार, निकम इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. शुभांगी निकम, विमलताई पवार, माजी नगरसेविका आरतीताई पवार, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख आशाताई कुवर, मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष आबासाहेब बी. टी. देवरे, ज्येष्ठ मार्गदर्शक बापूसाहेब एस. एम. पाटील, इंजि. बापूसाहेब डी. एस. कुवर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर जिजाऊ वंदना तसेच साने गुरुजींची ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष मनीषा पवार, सचिव सीमा वाघ आणि उपाध्यक्ष अलका बोरसे यांनी सादर केली. दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा संघटक अर्चना साळुंखे यांनी स्वागतगीत सादर केले.

ताराराणी महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या सचिव शिवमती उज्वलाताई पाटील यांनी प्रास्ताविकातून संघाच्या दशकभरातील कार्याचा आढावा मांडला. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शिवरायांच्या मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

संघातील ७५ वर्षे पूर्ण झालेल्या व त्यापुढील वयाच्या डॉ. शशिकला वाघ, प्रमिलाताई पवार, रेवतीताई देवरे आणि विजयाताई राजपूत यांचा श्री विठ्ठल-रुक्माई यांच्या मूर्ती देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून आपल्या मुलांना घडविणाऱ्या कल्पनाताई शिंदे आणि उषाताई नांद्रे यांचाही गौरव करण्यात आला.

धुळे शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघांच्या पदाधिकाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. उत्कर्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश लगडे, राजे संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ए. जी. पाटील, कौशल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष डॉ. उषा साळुंखे, हास्यमुक्ता संघाच्या अध्यक्ष उषाताई कुलकर्णी, मुक्ताई ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुष्पाताई भामरे, प्रभावती भावसार, छायाताई बडगुजर तसेच वालखेडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब पांडुरंग ठाकरे यांचा गौरव करण्यात आला.

ताराराणी महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष डॉ. सुलभा कुवर यांनी मनोगतात संघाची भूमिका स्पष्ट केली. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर संघाची वाटचाल सुरू असून महिलांना कर्मकांड आणि अंधश्रद्धेतून बाहेर काढत प्रबोधनाची दिशा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रावण महिन्यात शिवामूठ म्हणून धान्य वाहण्याऐवजी ते गरजूंपर्यंत पोहोचविणे, निर्माल्य नदीत न टाकता त्यापासून खतनिर्मिती करून पर्यावरण संवर्धन करणे, विद्यार्थ्यांना पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि गणवेशाचे वाटप करणे, विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे घेणे, तसेच शारदा नेत्रालयाच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिरांद्वारे गरजू रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून घेणे, असे विविध सेवाभावी उपक्रम संघाच्या माध्यमातून राबविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिजाऊ ब्रिगेड आणि ताराराणी महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष नूतनताई पाटील, जिल्हाध्यक्ष वसुमती पाटील, सचिव सीमा वाघ आणि सेवानिवृत्त केंद्रप्रमुख छाया पवार यांनी परिश्रम घेतले. मनीषा पवार, सीमा वाघ आणि अलका बोरसे यांनी जिजाऊ वंदना सादर केली. चंदाताई व नंदिनीताई यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. महानगर अध्यक्ष अर्चना खैरनार यांनी आभार मानले.

यावेळी मीनाताई ठाकरे, राजे शिवाजी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष नानासाहेब गुलाबराव पाटील, मराठा सेवा संघ पतपेढीचे व्यवस्थापक संजय पाटील, भगवान हिरे यांचे सहकार्य लाभले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

दहा वर्षांची वाटचाल पूर्ण करताना ज्येष्ठत्व हे केवळ वयाचे नव्हे, तर अनुभव, सेवाभाव आणि समाजप्रबोधनाची ताकद बनू शकते, असा प्रेरणादायी संदेश देणारा हा दशकपूर्ती सोहळा ठरला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या