महसूल दिनानिमित्त उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव



प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान; महसूल विभाग प्रशासनाचा कणा असल्याचे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांचे प्रतिपादन

एल्गार मराठी न्यूज 

धुळे: महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात महसूल विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते (भा.प्र.से.) यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महसूल विभागातील विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील (प्रशासन), उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, बालाजी क्षीरसागर, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक (शिरपूर) आदी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच पदोन्नतीने अपर आयुक्त, अमरावती येथे बदली झालेल्या अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून प्रत्येक आपत्ती, विकासकामे व शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत महसूल विभाग नेहमीच अग्रेसर राहिला आहे. कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी ई-ऑफिसचा वापर वाढविण्यावर त्यांनी भर दिला.

अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांनी मनोगत व्यक्त करताना गौरवप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीतून प्रेरणा घेऊन इतरांनीही जनतेसाठी समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक तसेच धुळे ग्रामीणचे तहसीलदार अरुण शेवाळे यांनी महसूल विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती देत सन्मानित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार अरुण शेवाळे, नायब तहसीलदार विजय गोस्वामी, लघुलेखक नितीन बागूल, सहाय्यक महसूल अधिकारी सुभाष बाविस्कर, मंडळ अधिकारी गजानन सोनवणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, महसूल सहाय्यक सागर सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी मोरे, मोराणेचे पोलीस पाटील सुभाष निकुंभे, मुलकी शिपाई प्रकाश वाघ आणि महसूल सेवक डोंगर माळी यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे आणि उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी केले. उपजिल्हाधिकारी संदीप पाटील यांनी आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या