आधुनिक दृकश्राव्य तंत्रज्ञानामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अनुभवला ‘सेव्हन सिस्टर्स’चा निसर्ग, संस्कृती आणि समाजजीवनाचा अनोखा प्रवास
एल्गार मराठी न्यूज
दोंडाईचा (प्रतिनिधी) : व्याख्यानातून केवळ सहलीचे वर्णन ऐकण्याऐवजी प्रत्यक्ष छायाचित्रे, व्हिडिओ चित्रफिती आणि ध्वनीच्या माध्यमातून ईशान्य भारतातील निसर्गसौंदर्य, समाजजीवन, कृषी व्यवस्था आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेण्याची अनोखी संधी दोंडाईचा येथील दादासाहेब रावल ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना मिळाली. संघाच्या मासिक स्नेहमेळाव्यात ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्य भारतातील राज्यांच्या सहल प्रवासाचे आधुनिक दृकश्राव्य तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रभावी आणि अभिनव सादरीकरण करण्यात आले. या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्याचे मनापासून स्वागत केले.
शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी दादासाहेब रावल ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. पी. गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली मासिक स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय सेवानिवृत्त आदिवासी विकास विभागाचे निरीक्षक तुकाराम वाडिले होते.
यावेळी सेवानिवृत्त जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आर. सी. रामोळे यांनी नुकत्याच केलेल्या ईशान्य भारत सहलीतील अनुभव पारंपरिक व्याख्यान पद्धतीऐवजी आधुनिक ध्वनी-चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडले. सहलीदरम्यान त्यांनी टिपलेली आकर्षक छायाचित्रे, रमणीय निसर्गदृश्ये, पर्वतरांगा, नद्या, धबधबे, धार्मिक व पर्यटन स्थळे तसेच विविध सांस्कृतिक वैशिष्ट्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात आली. त्यामुळे उपस्थितांना प्रत्यक्ष त्या स्थळांना भेट दिल्याचा अनुभव मिळाला.
सादरीकरणादरम्यान आर. सी. रामोळे यांनी ईशान्य भारतातील समाजव्यवस्था, स्थानिक लोकांचे राहणीमान, कृषी व्यवस्था, पारंपरिक संस्कृती, जीवनशैली, खाद्यसंस्कृती तसेच तेथील भौगोलिक वैशिष्ट्यांची माहिती अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण पद्धतीने दिली. आधुनिक दृकश्राव्य माध्यमाचा वापर केल्यामुळे प्रत्येक माहिती अधिक प्रभावीपणे उपस्थितांपर्यंत पोहोचली.
विशेष म्हणजे दादासाहेब रावल ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात अशा प्रकारे ध्वनी-चित्रफितीद्वारे सहल प्रवासवर्णन सादर करण्याचा हा पहिलाच प्रयोग ठरला. या अभिनव प्रयोगामुळे ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. अनेकांनी हा उपक्रम ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि मनोरंजक असल्याचे सांगत भविष्यातही देशातील विविध पर्यटन स्थळे, ऐतिहासिक प्रदेश आणि सांस्कृतिक वारसा यांवरील अशाच प्रकारच्या दृकश्राव्य सादरीकरणांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम वाडिले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे विशेष कौतुक करत अशा उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या ज्ञानात भर पडण्याबरोबरच त्यांना देशातील विविध भागांची माहिती घरबसल्या मिळते, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन संघाचे सचिव एस. डी. पाटील यांनी केले, तर कोषाध्यक्ष एस. एन. चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संघाचे ज्येष्ठ सदस्य, महिला-पुरुष सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या