शिक्षण, नोकरी, उद्योग व वैद्यकीय सेवांसाठी प्रवास करणाऱ्या खान्देशातील हजारो प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी
एल्गार मराठी न्यूज
धुळे : धुळे शहरासह संपूर्ण खान्देशातील नागरिकांच्या प्रवासाची वाढती गरज लक्षात घेऊन धुळे–पुणे–धुळे स्वतंत्र रेल्वे सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी ‘मी धुळेकर’ संघटनेने केली आहे. या मागणीसंदर्भात संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धुळे, नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा व परिसरातील हजारो विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि वैद्यकीय उपचारासाठी जाणारे रुग्ण दररोज पुण्याकडे प्रवास करतात. मात्र सध्या या प्रवाशांना बस किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून, हा प्रवास अनेक सर्वसामान्य नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारा ठरत नाही.
धुळे व नरडाणा औद्योगिक परिसरात उद्योगांची संख्या वाढत असल्याने अधिकारी, कर्मचारी आणि व्यावसायिकांची पुण्याकडे ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत धुळे–पुणे थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांसह औद्योगिक क्षेत्रालाही मोठा फायदा होईल, असा दावा संघटनेने केला आहे.
कोरोना महामारीपूर्वी धुळे–पुणे मार्गावर रेल्वेला दोन डबे जोडण्याची सुविधा उपलब्ध होती. या सुविधेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. मात्र कोरोना काळात ही सेवा बंद करण्यात आली. सध्या धुळे–मुंबई स्वतंत्र रेल्वेला मिळणारा चांगला प्रतिसाद पाहता, त्याच धर्तीवर धुळे–पुणे स्वतंत्र रेल्वेलाही मोठा प्रतिसाद मिळू शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संघटनेच्या मते, धुळे–पुणे रेल्वेमुळे धुळे, नंदुरबार आणि जळगावसह संपूर्ण खान्देशातील नागरिकांना सुरक्षित, जलद आणि परवडणारा प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. तसेच धुळे रेल्वेस्थानक परिसरातील व्यावसायिक, रिक्षाचालक, खानपान व निवास व्यवसायांना चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. धुळे व नरडाणा औद्योगिक क्षेत्राच्या दळणवळणालाही याचा सकारात्मक लाभ होईल.
"धुळे–पुणे रेल्वे ही केवळ धुळे शहराची नव्हे, तर संपूर्ण खान्देशातील हजारो प्रवाशांच्या सोयीची गरज आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून ही रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा," अशी अपेक्षा ‘मी धुळेकर’ संघटनेने व्यक्त केली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ‘मी धुळेकर’चे अध्यक्ष निरंजन भतवाल, दिनेश वाघ, छोटूभाऊ पोतदार, फरदिन शेख, सलमान पठाण, आफ्रिदी शेख आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या