धुळ्यात १५-१६ ऑगस्टला विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे ‘नवसमाजमाध्यम : संवाद सर्जनशीलता’ निवासी शिबिर



 समाजमाध्यमांचा प्रभावी वापर, आशय निर्मिती, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तांत्रिक प्रशिक्षणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

एल्गार मराठी न्यूज 

धुळे | प्रतिनिधी

विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र यांच्या वतीने दि. १५ व १६ ऑगस्ट २०२६ रोजी धुळे येथे ‘नवसमाजमाध्यम : संवाद सर्जनशीलता’ या विषयावर दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर संत रविदास समाज भवन, देवपूर, धुळे येथे होणार असून समाजमाध्यमांचा सामाजिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनवादी चळवळींसाठी प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीने गेल्या २५ वर्षांपासून प्रस्थापित साहित्य व सांस्कृतिक विषमतेला सातत्याने आव्हान देत शोषित, उपेक्षित आणि वंचित समाजाच्या प्रश्नांना सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचे कार्य केले आहे. बदलत्या डिजिटल युगात समाजमाध्यमांचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन सामाजिक चळवळींनी या माध्यमांचा प्रभावी आणि जबाबदारीने वापर करावा, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरात समाजमाध्यमांचे स्वरूप व उपयुक्तता, जगातील आणि भारतातील समाजमाध्यमांद्वारे उभ्या राहिलेल्या चळवळी, सामाजिक परिवर्तनासाठी डिजिटल माध्यमांचा वापर, आशय (कंटेंट) निर्मिती, पोस्ट, पॉडकास्ट, रिल्स, स्टेट्स, मायक्रोब्लॉगिंग, ब्लॉग लेखन, कॅप्शन लेखन, प्रमोशनल व माहितीपर पोस्ट्स तयार करण्याचे तंत्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित कायदे, संशोधन, वस्तुनिष्ठता, विश्वासार्हता, प्रभावी भाषा, आकर्षक शीर्षके, हॅशटॅगचा वापर आणि तांत्रिक प्रशिक्षण यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

या शिबिरासाठी राजू परुळेकर, निरंजन टकले, रवींद्र पोखरकर, प्रा. सतीश निकम, व्ही. टी. गवळे, राजू हाके, प्रा. भीमराव कढरे, वाल्मिक सुरवाडे, नजर पठाण, इद्रीस शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिरात मुक्ता कदम, आनंद शितोळे, रिमा अमरापूरकर, हनुमंत पवार, चित्रपट दिग्दर्शक महेश बनसोडे, प्रा. बापू चंदनशिवे, श्रीकांत काळोखे, प्रा. देवेंद्र इंगळे, लोकशाहीर संभाजी भगत, कॉ. धनाजी गुरव, डॉ. उमेश बगाडे आणि डॉ. भारत पाटणकर यांची उपस्थिती लाभणार आहे.

समाजमाध्यमांवर सामाजिक जाणीवेतून लिखाणाची आवड असलेले, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय प्रश्नांमध्ये रस असलेले, महामानवांच्या विचारांचे वाचन केलेले तसेच स्वतःची मते प्रभावीपणे मांडण्याची इच्छा असलेले सर्व वयोगटातील समविचारी कार्यकर्ते या शिबिरासाठी अर्ज करू शकतात.

शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रथम गुगल फॉर्म भरावा लागणार असून मर्यादित जागांमुळे अर्जांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शिबिरार्थींनी दोन दिवस पूर्णवेळ उपस्थित राहणे आवश्यक असून रु. १०० सहभाग शुल्क भरल्यानंतर सहभाग निश्चित होईल. निवासी स्वरूपाच्या या शिबिरात निवास, भोजन आणि चहापानाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी मो. 8459926644, 7776807385, 8263939583 आणि 7507988741 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या