धुळेत 'भीमस्मृती धम्म पदयात्रे'चे उत्स्फूर्त स्वागत; उद्या लांडोर बंगल्याकडे अंतिम टप्प्याची वाटचाल

 


आठ दिवसांच्या पायी प्रवासानंतर धुळ्यात आगमन; लांडोर बंगला येथे उद्या समारोप सोहळा

एल्गार मराठी न्यूज 

धुळे | वृत्त प्रतिनिधी : धनंजय गाळणकर

भंते नागसेन सातपुडा पर्वत यांच्या नेतृत्वाखाली जळगाव ते धुळे (लांडोर बंगला) सुरू असलेली 'भीमस्मृती धम्म पदयात्रा' गुरुवारी धुळे शहरात उत्साहपूर्ण वातावरणात दाखल झाली. आठ दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून धुळ्यात पोहोचलेल्या भिक्खू संघ, उपासक-उपासिका आणि भीमसैनिकांचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात आले.

पदयात्रेतील सहभागींच्या मुक्कामासाठी धुळे महानगरपालिकेच्या नगरसेविका वंदनाताई भामरे यांनी त्यांच्या भागाई शैक्षणिक संकुलात विशेष व्यवस्था केली आहे. भिक्खू संघ व सर्व पदयात्रींसाठी भोजन, निवास, पिण्याचे स्वच्छ पाणी, स्नानगृह तसेच विश्रांतीसाठी सुसज्ज हॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आठ दिवसांच्या कठीण पदयात्रेनंतर मिळालेल्या या सुविधांबद्दल भिक्खू संघाने समाधान व्यक्त केले.

२१ जुलै रोजी जळगाव येथून प्रारंभ झालेल्या या ऐतिहासिक पदयात्रेने खानदेशातील अनेक गावांमधून प्रवास करत सामाजिक समता, बंधुता, बौद्ध धम्म आणि भारतीय संविधानातील मूल्यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. ऊन, वारा, पाऊस तसेच दिवस-रात्र यांची पर्वा न करता पदयात्रींनी अविरत पायी प्रवास करत धुळे शहर गाठले.

पदयात्रेचे प्रमुख मार्गदर्शक भंते नागसेन सातपुडा पर्वत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, शुक्रवारी सकाळी स्नान, नाश्ता आणि धम्मवंदनेनंतर पदयात्रा धुळे शहरातून अंतिम टप्प्यासाठी प्रस्थान करेल. त्यानंतर पदयात्रा लांडोर बंगला येथे पोहोचून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळाला अभिवादन करण्यात येणार आहे.

दि. ३१ जुलै रोजी सकाळी लांडोर बंगला येथे होणाऱ्या समारोप सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भिक्खू संघ, उपासक-उपासिका, भीमसैनिक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी उपस्थित राहणार आहेत. यावेळी धम्मदेशना, अभिवादन आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नगरसेविका वंदनाताई भामरे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना, "'भीमस्मृती धम्म पदयात्रे'तील भिक्खू संघ आणि सहभागींची सेवा करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. त्यांच्या मुक्कामासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत," असे सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक स्मृतींना अभिवादन करण्यासाठी सुरू झालेल्या या पदयात्रेचा अंतिम टप्पा आता पूर्णत्वाकडे पोहोचला असून, धुळे जिल्ह्यातील लांडोर बंगला येथे होणारा समारोप या ऐतिहासिक धम्मयात्रेचा संस्मरणीय क्षण ठरणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या