नवापूरच्या विसरवाडी व साक्री येथे शेतकरी प्रश्न, MSP कायदा, कर्जमाफी, पिकविमा आणि जमीन अधिग्रहणासह विविध विषयांवर मार्गदर्शन
एल्गार मराठी न्यूज
धुळे |अमेरिका-भारत प्रस्तावित व्यापार करार (US Trade Deal), शेतकरीविरोधी धोरणे, किमान हमीभाव (MSP) कायदा, कर्जमाफी, पिकविमा, जमीन अधिग्रहण आणि इतर शेतकरी प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत आणि राष्ट्रीय महासचिव युद्धवीरसिंग हे देशव्यापी दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत १ ऑगस्ट २०२६ रोजी नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात दोन जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
ही माहिती सत्यशोधक शेतकरी सभेचे राज्य सचिव किशोर ढमाले आणि भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर नलावडे-पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यात पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक भागांमध्ये दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून, शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. मात्र, नैसर्गिक संकटांइतकीच सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झालेली संकटेही गंभीर असल्याचा आरोप त्यांनी केला.
१९९० नंतर कृषी क्षेत्रात खुल्या बाजारपेठेच्या धोरणाला प्रोत्साहन देण्यात आले. मात्र, अमेरिका, युरोप, चीनसह अनेक विकसित देश आपल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देतात. त्यामुळे त्या देशांतील अनुदानित कृषी व दुग्धजन्य उत्पादने भारतात आयात झाल्यास भारतीय शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवरही टीका करताना शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ, पिकविमा कंपन्यांची मनमानी, कर्जमाफी योजनांची अपुरी अंमलबजावणी, कांदा व कापूस निर्यात-आयात धोरणातील बदल, MSP गॅरंटी कायद्याबाबतची भूमिका तसेच विविध विकास प्रकल्पांच्या नावाखाली शेतकरी व विशेषतः आदिवासींचे वाढते विस्थापन या मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली.
तसेच वनजमिनी कंपन्यांना देणे, खाण उद्योगासाठी जंगल क्षेत्र उपलब्ध करून देणे आणि जंगलातील आदिवासींच्या हक्कांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी येथे आर. टी. गावीत यांच्या अध्यक्षतेखाली, तर दुपारी ३ वाजता धुळे जिल्ह्यातील साक्री येथील बाल आनंदनगरी येथे यशवंत माळचे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभांमध्ये राकेश टिकैत, युद्धवीरसिंग, करणसिंग कोकणी, किशोर ढमाले, रणजित गावित, दिलीप गावित, शितल गावित, मिरुलाल पवार, भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष भाई चंद्रशेखर पाटील, राज्य महासचिव रुपालीताई पाटील तसेच श्रमिक शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष राजेंद्र बावके यांसह विविध नेते मार्गदर्शन करणार आहेत.
या जाहीर सभांना खान्देशातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी बांधव आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुरेश मोरे, अशपाक कुरेशी, शिवदास बागुल, मन्साराम पवार, रामलाल गवळी, लालाबाई भोये, सुशिला राऊत, दिलीप गावित, रतन सोनावणे, प्रकाश सोनावणे, बाळू सोनावणे आणि शांताराम पवार यांनी केले.


0 टिप्पण्या