३१ जुलै रोजी धुळ्यात भव्य संदेश मेळाव्याचे आयोजन; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांची विशेष उपस्थिती



 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ८९ व्या संदेशभूमी आगमन दिनानिमित्त सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह भिक्खू संघ व मान्यवरांची उपस्थिती

एल्गार मराठी न्यूज 

धुळे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्त्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धुळे येथील ट्रॅव्हलर्स बंगलो अर्थात 'संदेशभूमी' येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगमनास यंदा ८९ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, ३१ जुलै रोजी भव्य संदेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सन २०१६ पासून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या संदेश मेळाव्याचा उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जागविणे, त्यांनी संदेशभूमीवर दिलेल्या विचारांचा प्रचार-प्रसार करणे आणि संदेशभूमीला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा मिळवून देण्यासाठी जनजागृती करणे हा आहे.

यंदाच्या मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री नामदार संजयजी शिरसाट हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच पूज्य भिक्खू संघाची विशेष उपस्थिती लाभणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष पूज्य भंते डॉ. धम्मदीप महाथेरो, महाबोधी मुक्ती आंदोलनाचे प्रमुख पूज्य भंते विनाचार्य तसेच संदेशभूमीचे पूज्य भंते आनंद थेरो यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद उपस्थितांना लाभणार आहेत.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल, धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, धुळे शहराचे आमदार अनुभैय्या अग्रवाल, साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित, धुळे महानगरपालिकेच्या महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह डॉ. तुळशीराम गावी, प्रा. सुनील मगरे, ॲड. भैय्यासाहेब विलास झाल्टे, प्राचार्य बाबा हातेकर, दिलीप अप्पा साळवे, शोभाताई चव्हाण, दलित नेते अण्णासाहेब वाल्मीक, डॉ. कृष्णमोहन सैंदाणे, डॉ. विजय कांबळे, डॉ. दीपक शेजवळ, अभियंता जी. के. गवळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद भदाणे, कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले, महानगरप्रमुख संजय वाल्हे, संभाजीनगरचे उपजिल्हाप्रमुख प्रा. संतोष बोर्डे, उपअभियंता धर्मेंद्र झाल्टे, इर्शादभाई जागीरदार, ॲड. मधुकर नाना भिसे, ॲड. आनंद जगदेव, निवृत्त समाजकल्याण अधिकारी संजय सैंदाणे, देविदास नेरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संदेशभूमीला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा मिळावा आणि या मागणीसाठी समाजाची एकजूट व सामूहिक शक्ती दाखवून देण्यासाठी धुळे शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने संदेश मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत संदेशभूमी समितीचे अध्यक्ष आनंद सैंदाणे, संदेश मेळाव्याचे स्वागताध्यक्ष डॉ. गौतम शिलवंत, ॲड. भैय्यासाहेब विलास झाल्टे, डॉ. विजय कांबळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या