आरोग्य विभाग व अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्याचे सर्वत्र कौतुक
एल्गार मराठी न्यूज
अमळनेर | प्रतिनिधी :
अमळनेर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून भाळेराव नगर परिसरातील गुरुकृपा कॉलनीत नाल्याला अचानक आलेल्या पुरामुळे एका घरात पाणी शिरले. या घटनेत अवघ्या एका महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले होते. आरोग्य विभाग व अग्निशमन दलाच्या तत्पर आणि धाडसी बचावकार्यामुळे सर्व कुटुंबीयांची सुखरूप सुटका करण्यात आली.
घरात पाणी झपाट्याने शिरू लागल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या तातडीच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाचे निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे तसेच अग्निशमन दलाचे फायरमन रोख, दिनेश बिऱ्हाडे, भिका सदानंदशीव आणि पवन बिऱ्हाडे हे घटनास्थळी दाखल झाले.
पुराच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने बचावकार्य मोठे आव्हानात्मक ठरत होते. मात्र, दोर, लाइफ जॅकेट आणि आवश्यक साधनसामग्रीच्या साहाय्याने बचाव पथकाने सुमारे दोन तास अथक प्रयत्न करत पाण्यात अडकलेल्या कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांची सुखरूप सुटका केली.
या बचावकार्यात एका महिन्याच्या चिमुकल्याला प्लास्टिकच्या टबमध्ये सुरक्षित ठेवून पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बाळासह सर्व कुटुंबीयांना जवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संकटाच्या काळात जीवाची पर्वा न करता दाखविलेल्या धाडस, तत्परता आणि सेवाभावामुळे आरोग्य विभाग व अग्निशमन दलाच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या धाडसी बचावकार्यातून अमळनेरच्या आपत्कालीन यंत्रणेने पुन्हा एकदा आपल्या कर्तव्यदक्षतेची प्रचिती दिली आहे.


0 टिप्पण्या