संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूरपरिस्थितीचा आढावा




 यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना; नागरिकांना अफवांपासून दूर राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन.


एल्गार मराठी न्यूज 

धुळे : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते (भा.प्र.से.) यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा सविस्तर आढावा घेत संबंधित सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे तसेच सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंते दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पर्जन्यमान, नदी-नाल्यांतील पाणीपातळी, धरणांमधून होणारा विसर्ग आणि संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, जलसंपदा, महावितरण, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी परस्पर समन्वयाने काम करून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदतकार्य सुरू करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच शोध व बचावासाठी उपलब्ध साहित्य सुस्थितीत ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील किंवा नाल्याकाठावरील गावांतील नागरिक अडकून पडणार नाहीत, यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले. गरज भासल्यास नागरिकांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांच्या निवास, भोजन, पिण्याचे पाणी, औषधोपचार आणि इतर अत्यावश्यक सुविधांची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. याशिवाय जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या