एसआयआर अँनोमलीवर समाजवादी पार्टीचे मार्गदर्शन शिबिर; नागरिकांच्या शंकांचे तज्ज्ञांकडून निरसन




 ॲड. जुबेर शेख यांचे सविस्तर मार्गदर्शन; उपमहापौर शाहेनिद मॅडम यांची प्रमुख उपस्थिती, कायदेशीर व प्रक्रियात्मक बाबींवर सखोल चर्चा

एल्गार मराठी न्यूज 

धुळे | वृत्त प्रतिनिधी


समाजवादी पार्टीच्या वतीने एसआयआर अँनोमली विषयावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने रविवारी (दि. १९ जुलै) आझाद नगर, वडजाई रोड येथील शाही हॉलमध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात संबंधित विषयाची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच उपस्थित नागरिकांच्या विविध शंकांचे कायदेशीर व प्रक्रियात्मक पातळीवर समाधानकारक निरसन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष गुड्डू काकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. जुबेर शेख यांनी एसआयआर अँनोमली संदर्भातील विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले. या विषयाशी संबंधित नियम, प्रक्रिया, नागरिकांचे अधिकार तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितली. नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे देत अनेक गैरसमज दूर केले.


या मार्गदर्शन शिबिराला मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शाहेनिद मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी नागरिकांनी शासकीय प्रक्रियेबाबत जागरूक राहून योग्य माहितीच्या आधारे आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन केले.


यावेळी समाजवादी पार्टीचे प्रमुख महासचिव जमील मन्सुरी यांनी मनोगत व्यक्त करत अशा प्रकारची जनजागृती शिबिरे नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग्य माहिती पोहोचावी आणि नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत सजग करता यावे, या उद्देशाने पक्षाकडून अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.


कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी एसआयआर अँनोमलीबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना ॲड. जुबेर शेख यांनी कायदेशीर तरतुदी, प्रशासकीय प्रक्रिया आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामुळे उपस्थित नागरिकांच्या अनेक शंकांचे निरसन झाले.


मार्गदर्शन शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जाकीर खान, निहाल अन्सारी, इमरान शेख, अकील शाह, रशीद शाह, मुबीन अन्सारी, अप्पू अन्सारी, मोहम्मद जैद, नासीर शेख, साबीर मिर्झा, रशीद रंगरेज, फहीम काकर यांच्यासह समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माहितीपूर्ण सत्र, प्रश्नोत्तरांचा खुला संवाद आणि तज्ज्ञांकडून मिळालेले मार्गदर्शन यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या