संदेशभूमी मेळाव्यास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची उपस्थिती; ३१ जुलैला धुळ्यात ऐतिहासिक कार्यक्रम


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमीवर ८९ व्या स्मृतिदिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन


एल्गार मराठी न्यूज


धुळे|प्रतिनिधी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धुळ्यातील ट्रॅव्हलर्स बंगलो अर्थात संदेशभूमी येथे ३१ जुलै रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या संदेश मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ उपस्थित राहणार आहेत. संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीच्या शिष्टमंडळाने संभाजीनगर येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिल्यानंतर त्यांनी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.

दि. ३१ जुलै १९३७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संदेशभूमीला भेट दिली होती. त्या ऐतिहासिक घटनेला यंदा ८९ वर्षे पूर्ण होत असल्याने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणावर संदेश मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यास महाराष्ट्रातील प्रमुख बौद्ध भिक्षू, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीने दिली.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांना निमंत्रण देण्यासाठी धुळे शिवसेना महानगर प्रमुख संजय वाल्हे, संभाजीनगर उपजिल्हाप्रमुख प्रा. संतोष बोर्डे, संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीचे अध्यक्ष आनंद सैंदाणे, बाळासाहेब अहिरे, विजय भामरे आणि योगेश चौधरी यांनी संभाजीनगर येथे भेट घेतली. यावेळी संदेशभूमीचा ऐतिहासिक वारसा, उपलब्ध पुरावे आणि संवर्धनाच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती शिरसाठ यांना देण्यात आली.

या भेटीनंतर मंत्री शिरसाठ यांनी संदेश मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आश्वासन दिल्याने संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ३१ जुलै रोजी होणाऱ्या संदेश मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी समितीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या