MS-CIT ला राष्ट्रीय SKOCH Award; AI-सक्षम नव्या अभ्यासक्रमासह MKCL ची 'महाराष्ट्र AI रेडी' मोहीम सुरू


 एल्गार मराठी न्यूज 

AI आधारित MS-CIT, १२५ हून अधिक AI टूल्सचे प्रशिक्षण, २६५+ KLIC कोर्सेस आणि नागरिकांसाठी मोफत AI मास्टरक्लासची घोषणा

धुळे | प्रतिनिधी : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त MS-CIT या राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय डिजिटल साक्षरता अभ्यासक्रमाला प्रतिष्ठेचा राष्ट्रीय SKOCH Award मिळाला आहे. या यशानंतर MKCL ने 'आपण करूया महाराष्ट्र AI रेडी' ही राज्यव्यापी मोहीम सुरू करत AI-सक्षम नवीन MS-CIT अभ्यासक्रम, २६५ हून अधिक KLIC व्यावसायिक कोर्सेस आणि सर्व नागरिकांसाठी मोफत AI मास्टरक्लासची घोषणा केली आहे.


गेल्या २५ वर्षांत MKCL ने MS-CIT च्या माध्यमातून १.७ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर केले आहे. डिजिटल शिक्षण, कौशल्यविकास, सामाजिक समावेशन आणि नागरिक सक्षमीकरणातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत MS-CIT ला राष्ट्रीय स्तरावरील SKOCH Award प्रदान करण्यात आला आहे.


या सन्मानाबद्दल MKCL चे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांनी समाधान व्यक्त करत हा पुरस्कार लाखो विद्यार्थी, पालक, प्रशिक्षण केंद्रप्रमुख, प्रशिक्षक, नेटवर्क पार्टनर्स, MSBTE, MKCL परिवार आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याचे फलित असल्याचे सांगितले.


AI युगासाठी राज्यव्यापी जनजागृती


MKCL ने सुरू केलेली 'आपण करूया महाराष्ट्र AI रेडी' ही मोहीम २३ जून २०२६ पासून राज्यभर राबविण्यात येत असून पुढील ६० दिवस ती सुरू राहणार आहे. अधिकृत MKCL शिक्षण केंद्रांमार्फत शाळा, महाविद्यालये आणि निवासी भागांमध्ये जाऊन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयी जनजागृती केली जात आहे.


या मोहिमेअंतर्गत www.mscit.ai या संकेतस्थळावर सर्वांसाठी मोफत ६० मिनिटांचा AI मास्टरक्लास उपलब्ध करण्यात आला आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शासकीय कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना या मास्टरक्लासचा लाभ घेता येणार असून पूर्ण केल्यानंतर आकर्षक प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.


AI-सक्षम नवीन MS-CIT


नवीन MS-CIT अभ्यासक्रमात AI, सायबर सुरक्षा, डेटा साक्षरता आणि क्लाउड कंप्युटिंग यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ChatGPT, Microsoft Copilot, Google Gemini, Canva AI यांसह १२५ हून अधिक AI टूल्स आणि २५० पेक्षा अधिक डिजिटल कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे.


याशिवाय विद्यार्थ्यांच्या शंकांचे तत्काळ निरसन करण्यासाठी 'ERA KRANTI' हा AI आधारित पर्सनलाइज्ड चॅटबॉट उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच MS-CIT सोबत Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) हा नवीन टायपिंग अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला आहे.


रोजगाराभिमुख २६५+ KLIC कोर्सेस


MKCL तर्फे KLIC (Knowledge Lit Career) अंतर्गत २६५ हून अधिक रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डेटा सायन्स, डिजिटल डिझायनिंग, टॅली विथ GST, अॅडव्हान्स एक्सेल, वेब डिझायनिंग, सायबर सिक्युरिटी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आयटी हार्डवेअर आणि नेटवर्किंग यांसारख्या क्षेत्रांतील अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.


१२० तासांचे KLIC अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना MKCL प्रमाणपत्रासोबत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) मान्यताप्राप्त गुणपत्रिका दिली जाते. तसेच तीन KLIC अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना 'KLIC डिप्लोमा' प्रदान केला जातो.


सध्या महाराष्ट्रातील ५,००० हून अधिक अधिकृत MKCL शिक्षण केंद्रांवर MS-CIT, CCTP आणि KLIC अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी 'आपण करूया महाराष्ट्र AI रेडी' मोहिमेत सहभागी होऊन मोफत AI मास्टरक्लासचा लाभ घ्यावा, असे आवाहन MKCL तर्फे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; ९ जुलै रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन!

एमआयएमची धुळे शहर व जिल्हा कार्यकारिणी घोषित; सोशल इंजिनिअरिंगवर भर

धुळे शहराला लाभले आदिशक्ती श्री चामुंडामातेचे भव्य मंदिर; प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न