वर्षावास निमित्ताने प्रा. डॉ. भूषण पाटील यांच्या प्रबोधन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
एल्गार मराठी न्यूज
धुळे | दि. ४ ऑक्टोबर: अतुल्य वर्षावास बुद्धाब्द २५७० निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मनोहर टॉकीजमागे, धुळे येथे ‘अंधश्रद्धा आणि बुवाबाजी’ या विषयावर प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्य कोषाध्यक्ष अंनिसचे प्रा. डॉ. भूषण पाटील यांनी उपस्थितांना अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि तथाकथित चमत्कारांमागील वास्तव समजावून सांगत प्रबोधन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते आप्पासाहेब एस. यू. तायडे होते. प्रमुख अतिथी म्हणून बी. टी. अहिरे (जिल्हाध्यक्ष, BSI), सौराज सिंग (दिल्ली), रणजित शिंदे, विजयभाऊ गुजर आणि नितीन बागुल (जिल्हा बुवाबाजी संघर्ष प्रतिबंधक अंनिस) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवर तसेच आयोजक हिराताई महेंद्र महाले व महाले परिवाराच्या वतीने महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक त्रिशरण व पंचशील घेण्यात आले.
प्रबोधनपर मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. भूषण पाटील यांनी अंधश्रद्धा आणि बुवाबाजीचे विविध प्रकार, भोंदूबाबांकडून दाखवण्यात येणारे तथाकथित चमत्कार तसेच हातचलाखीचे प्रकार प्रात्यक्षिकांसह उलगडून दाखवले. या प्रात्यक्षिकांमधून चमत्कारांमागील विज्ञान आणि हातचलाखी स्पष्ट करत त्यांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आप्पासाहेब एस. यू. तायडे म्हणाले, “तथागत भगवान बुद्धांचा विज्ञानवादी विचार व्यक्ती आणि राष्ट्राला प्रगतीपथावर नेणारा आहे. फुले, शिव, शाहू, आंबेडकरी विचार आणि साहित्य तळागाळातील बहुजन समाजाच्या मनामनात रुजले आहे. महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित समाज विज्ञानाची कास सोडू शकत नाही.”
कार्यक्रमास शंकर आण्णा खरात, महेंद्र दादा शिरसाठ, आनंद सैंदाणे, प्रदीप पानपाटील, कडुबा पवार, मदनभाऊ बाविस्कर, रामदास गायकवाड, अभिषेक साळवे, राजू आप्पा अहिरे, अॅड. मयूर बैसाणे, आनंद पगारे, रत्नशील सोनवणे, बापू अहिरे, सुनील निकम, मनोज शिरसाठ आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध भागांतील धम्म उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. जांभळी घाट, औरंगाबाद, कन्नड, चोपडा आदी ठिकाणांहूनही धम्म उपासक-उपासिकांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार देवरे यांनी केले. विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रांतील मान्यवर, धम्म उपासक व उपासिकांचा सत्कार करण्यात आला. महेंद्र आण्णा महाले, कैलास महाले, राहुल महाले, धम्मराज महाले आणि महानाम महाले यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे शाखा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या