ग.स. बँकेवर पुन्हा लोकमान्य पॅनलचे वर्चस्व; सर्व उमेदवारांचा विजय

 



निशांत रंधे व संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता कायम; आर्थिक शिस्त लावण्याचे नूतन संचालकांसमोर मोठे आव्हान

एल्गार मराठी न्यूज 


प्रतिनिधी | धुळे

धुळे व नंदुरबार सरकारी नोकरांची सहकारी बँक अर्थात ग.स. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी लोकमान्य पॅनलने पुन्हा एकदा बँकेची सत्ता कायम राखत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गटनेते निशांत रंधे आणि पॅनल प्रमुख संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या लोकमान्य पॅनलच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळविल्याने विरोधकांना पराभव स्वीकारावा लागला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांसह समर्थकांनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला.

ग.स. बँकेच्या संचालक मंडळातील २१ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर पाच जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे उर्वरित १६ जागांसाठी २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले होते.

दि. ३० ऑगस्ट रोजी चार जिल्ह्यांतील तब्बल २२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, गत निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का कमी राहिल्याचे चित्र दिसून आले. या निवडणुकीत केवळ ५२.२१ टक्के मतदान झाले.

सर्वसाधारण गट आणि महिला गटातील काही जागांवर उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक लढत रंगली. लोकमान्य पॅनलने निवडणुकीतील सर्व जागांसाठी उमेदवार उभे केले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे बँकेच्या सभासदांसह सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले होते.

सहा टेबलांवर मतमोजणी; दुपारी निकाल जाहीर

मतदानानंतर सोमवारी सकाळपासून अग्रवाल विश्राम सभागृह परिसरातील भवनाशेजारी मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. मतमोजणीसाठी सहा टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. मतमोजणी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आली.

दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. निकालात लोकमान्य पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेत विजय मिळविल्याने बँकेच्या संचालक मंडळावर पुन्हा लोकमान्य पॅनलचे वर्चस्व कायम राहिले.

निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला. या विजयामुळे लोकमान्य पॅनलने बँकेतील आपली पकड पुन्हा एकदा मजबूत असल्याचे दाखवून दिल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे.

आर्थिक शिस्त लावण्याचे नूतन संचालकांसमोर मोठे आव्हान

ग.स. बँकेसमोर सध्या आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे मोठे आव्हान आहे. सन २०१७ मध्ये रिझर्व्ह बँकेने बँकेच्या आर्थिक निकषांबाबत आक्षेप नोंदवत तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. त्यानंतर सन २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत लोकमान्य पॅनलने सत्ता मिळविली.

मात्र, बँकेची आर्थिक परिस्थिती अद्यापही अपेक्षित प्रमाणात सुधारलेली नसल्याचे चित्र आहे. आर्थिक स्थितीशी संबंधित विविध अडचणींमुळे सभासदांना कर्जपुरवठ्यासह अन्य बँकिंग सुविधांबाबतही अडथळे येत असल्याची चर्चा आहे.या पार्श्वभूमीवर नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळासमोर बँकेच्या आर्थिक व्यवहारात शिस्त आणणे, आर्थिक स्थिती मजबूत करणे, सभासदांचा विश्वास वाढविणे आणि बँकेचे कामकाज अधिक सक्षम करणे ही महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. आगामी काळात नूतन संचालक मंडळ बँकेच्या आर्थिक सुधारणांसाठी कोणती पावले उचलते, याकडे सभासदांचे लक्ष लागून राहणार आहे.

हे आहेत नवनिर्वाचित संचालक

सर्वसाधारण गटातून - प्रशांत शरद बोरसे, प्रवीण धनराज भदाणे, दीपक सयाजीराव अहिरे, बिपीनचंद्र शिवाजी सोमवणे, विजयकुमार सुरेश माळी, अमोल संभाजी शिंदे, बापूराव अर्जुन पाटील, मयुर पवार, प्रकाश छगन बच्छाव, देवेंद्र जगन्नाथ बोरसे, दीपक निकम, आनंदराव संपतराव करनकाळ आणि वैभव मधुकर सोनवणे.

जळगाव जिल्ह्यातून सर्वसाधारण गट - भूपेंद्र जिजाबराव बाविस्कर.

महिला राखीव गट - सोनाली अविनाश भामरे आणि कविता दिगंबर मोरे.

पाच उमेदवार बिनविरोध

निवडणूक प्रक्रियेत पाच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामध्ये सर्वसाधारण गटातून अहमदनगर जिल्ह्यासाठी संदीप येळवंडे, नाशिक जिल्ह्यासाठी लक्ष्मण देसले, अनुसूचित जाती-जमाती गटातून शंकर वसावे, भटक्या व विमुक्त जाती-जमाती गटातून योगेश धात्रिक तसेच ओबीसी गटातून शशांक रंधे यांचा समावेश आहे.


लोकमान्य पॅनलच्या या विजयामुळे ग.स. बँकेच्या पुढील पंचवार्षिक कारकिर्दीचा मार्ग निश्चित झाला आहे. मात्र, सत्ता कायम राखण्यात यश मिळाले असले तरी बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करून आर्थिक शिस्त प्रस्थापित करण्याची खरी कसोटी आता नव्या संचालक मंडळासमोर असणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या