पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन; महापालिका व एबी फाउंडेशनच्या संचलनातून अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध
एल्गार मराठी न्यूज
धुळे | ता. ८ : धुळेकरांच्या आरोग्यसेवेत महत्त्वाची भर पडणार असून, महापालिका आणि आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या संकल्पनेतील एबी फाउंडेशन संचलित (स्व.) सौ. विमलादेवी ओमप्रकाश अग्रवाल मल्टिस्पेशालिटी धर्मादाय रुग्णालयाचे रविवारी (ता. ९) दुपारी चार वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. चक्करबर्डी परिसरातील महाराजा अग्रसेन टाउनशिप येथे उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक रुग्णालयामुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध आजारांवर उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे.
आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यास जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापालिकेतील भाजपच्या गटनेत्या किरण कुलेवार, स्थायी समितीच्या सभापती लताबाई सोनार, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, उपसभापती शोभा भिल, महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. संपदा कुलकर्णी, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी सोनवणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विविध यंत्रसामग्रीने सुसज्ज रुग्णालय
नगरसेविका सारिका अग्रवाल आणि चित्रलेखा परदेशी यांच्या सूचनेतून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात मेंदूविकार, अस्थिरोग, स्त्रीरोग, किडनीसह विविध आजारांवर अत्याधुनिक उपकरणे व यंत्रसामग्रीच्या सहाय्याने उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांची सुविधाही येथे उपलब्ध राहणार आहे.
सद्यःस्थितीत रुग्णालयात २६ बेडची व्यवस्था असून, सर्व बेड वातानुकूलित आहेत. काही आजारांवर सवलतीच्या दरात, तर काही आजारांवर मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना त्याचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे.
रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यास धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगरसेविका सारिका अग्रवाल, चित्रलेखा परदेशी आणि एबी फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश देवरे यांनी केले आहे.
रुग्णालयाला स्व. विमलादेवी अग्रवाल यांचे नाव
महापालिका आणि एबी फाउंडेशनच्या संचलनातून सुरू होणाऱ्या या रुग्णालयाला आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या मातोश्री (स्व.) विमलादेवी ओमप्रकाश अग्रवाल यांचे नाव देण्यात आले आहे.
स्व. विमलादेवी अग्रवाल यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच सामाजिक व राजकीय क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्यपद भूषविले होते. तसेच १९९२ ते २००२ या कालावधीत सलग दहा वर्षे भाजपच्या धुळे शहराच्या नगरसेविका म्हणून कार्य केले.
लक्ष्मी महिला सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी धुळे तालुक्यातील उडाणे येथे आदिवासी आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरू करून गोरगरीब व आदिवासी समाजातील मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या जयंतीनिमित्त रविवारी या रुग्णालयाचे लोकार्पण होत असून, त्याद्वारे सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे नवे दालन खुले होणार आहे.


0 टिप्पण्या