बंदिस्त डोमच्या कामाला सुरुवात; मातीचा आखाडा, स्वतंत्र मॅट आखाडा, आंतरराष्ट्रीय कुस्ती मॅट, आधुनिक विद्युत व्यवस्था आणि प्रेक्षक गॅलरीसह विविध सुविधांचा समावेश
एल्गार मराठी न्यूज
धुळे | दि. ८ : धुळे शहरातील कुस्तीची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक जवाहरलाल स्टेडियमच्या आधुनिकीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता प्रत्यक्ष मार्गी लागला आहे. स्टेडियमचे रूप पालटण्यासाठी शहराचे आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, संपूर्ण स्टेडियमला बंदिस्त डोम उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उन्हाळा असो अथवा पावसाळा, भविष्यात या स्टेडियममध्ये कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
जवाहरलाल स्टेडियमला धुळ्याच्या कुस्ती क्षेत्राचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. १३ ऑक्टोबर १९६४ रोजी या स्टेडियमचे उद्घाटन झाले. त्यानंतरच्या काळात देश-विदेशातील अनेक नामवंत मल्लांनी या मैदानावर आपल्या कुस्ती कौशल्याचे दर्शन घडविले. अनेक थरारक कुस्ती सामन्यांचे साक्षीदार ठरलेले हे स्टेडियम काळाच्या ओघात जीर्ण झाले होते. त्यामुळे त्याचे आधुनिकीकरण करण्याची मागणी कुस्तीप्रेमी, वस्ताद आणि तालिम संघांकडून सातत्याने होत होती.
या पार्श्वभूमीवर स्टेडियमचे केवळ नूतनीकरण न करता त्याला आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित कामांमध्ये नवीन माती आणून मातीचा आखाडा तयार करणे, मॅटसाठी स्वतंत्र आखाडा, आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती मॅट खरेदी करणे आणि ती सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष, तसेच कार्यालयाची सुविधा निर्माण करण्याचा समावेश आहे.
प्रेक्षक गॅलरीसह सुविधांमध्ये होणार मोठी वाढ
स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीचे आधुनिकीकरण करून तिची क्षमता वाढविण्यात येणार आहे. कुस्ती स्पर्धांसाठी आवश्यक असलेली फोकस लाईट व्यवस्था, आधुनिक विद्युतीकरण, ध्वनिव्यवस्था आणि प्रमुख पाहुण्यांसाठी व्हीआयपी स्टेज उभारण्यात येणार आहे.
याशिवाय खेळाडूंसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. स्टेडियममध्ये दोन स्वच्छतागृहे आणि बाथरूमची व्यवस्था करण्यात येणार असून, कुस्तीपटू तसेच प्रशिक्षकांना सराव व स्पर्धांच्या काळात अधिक चांगल्या सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.
पावसाळ्यातही रंगणार कुस्तीचा थरार
या संपूर्ण प्रकल्पातील सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्टेडियमला बंदिस्त डोमने झाकण्याचे काम. सध्या या कामाला सुरुवात झाली आहे. डोमचे काम पूर्ण झाल्यानंतर पाऊस किंवा कडक उन्हामुळे कुस्ती स्पर्धांमध्ये अडथळा येणार नाही. त्यामुळे वर्षभर विविध कुस्ती स्पर्धा, सराव आणि उपक्रम आयोजित करण्यासाठी स्टेडियमचा उपयोग करता येणार आहे.
धुळ्यातील कुस्तीला मोठी परंपरा आहे. या परंपरेला आधुनिक पायाभूत सुविधांची जोड मिळाल्यास नवोदित मल्लांना प्रशिक्षणासाठी चांगले व्यासपीठ मिळू शकते. त्याचबरोबर जिल्ह्यातील कुस्तीपटूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी तयारी करण्यासही या सुविधांचा उपयोग होईल.
काही कामे पूर्णत्वास; उर्वरित कामे लवकरच
जवाहरलाल स्टेडियममध्ये आतापर्यंत बोअरिंग, साऊंड सिस्टीम आदी कामे पूर्णत्वास गेली आहेत. प्रस्तावित इतर कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असून, काम पूर्ण झाल्यानंतर धुळेकर कुस्तीप्रेमींना आधुनिक आणि सर्व सुविधांनी युक्त स्टेडियम पाहायला मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या आधुनिकीकरणामुळे ऐतिहासिक जवाहरलाल स्टेडियमला नवसंजीवनी मिळणार असून, धुळ्याच्या कुस्ती संस्कृतीला पुन्हा एकदा मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. जुन्या आठवणी आणि नव्या सुविधांचा संगम या माध्यमातून साधला जाणार असल्याने धुळ्याच्या क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे.
कुस्तीप्रेमींसाठी ऐतिहासिक पाऊल : रवींद्र आघाव
याबाबतची माहिती धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आघाव ऊर्फ गड्या पैलवान यांनी दिली. स्टेडियमचे आधुनिकीकरण, बंदिस्त डोम आणि आधुनिक सुविधांमुळे धुळे शहरातील कुस्तीला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आघाव, सचिव दिलीप जगताप, योगेश चव्हाण सर, संजय चौधरी, बाबा कोळी, दत्तू आप्पा कल्याणकर, कृष्णा शिंदे, विनायक काकडे, समीर गवळी, नंदलाल फुलपाखारे, रमेश लहामगे, राम सोनवणे, संजय महाले, युनूस शेख, जमील भाई, संदीप पाटोळे, राजेंद्र देवरे, अशोक कराड ऊर्फ फोमा पैलवान, पिंटू यादव पैलवान, नंदलाल दरगुडे, वाल्मीक मराठे आदी पहेलवान, वस्ताद, तालीम संघाचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि कुस्तीप्रेमी उपस्थित होते.
संपादकीय निरीक्षण
जवाहरलाल स्टेडियमचा इतिहास हा केवळ एका इमारतीचा इतिहास नाही, तर धुळ्याच्या कुस्ती परंपरेचा जिवंत दस्तऐवज आहे. १९६४ पासून या मैदानाने अनेक पिढ्यांतील मल्लांच्या संघर्षाचा आणि यशाचा साक्षीदार म्हणून भूमिका बजावली आहे. त्यामुळे दोन कोटी रुपयांच्या आधुनिकीकरणातून या वास्तूला आधुनिक रूप देताना तिच्या ऐतिहासिक ओळखीचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे ठरेल. बंदिस्त डोम, आंतरराष्ट्रीय मॅट आणि आधुनिक सुविधा प्रत्यक्षात कार्यक्षम झाल्यास धुळ्याला दर्जेदार कुस्ती स्पर्धांसाठी सक्षम व्यासपीठ मिळू शकते.


0 टिप्पण्या