न्यायालयीन संघर्ष बाजूला ठेवून संस्थेचे धम्मप्रसार व सामाजिक कार्य सातत्याने सुरू
एल्गार मराठी न्यूज
धुळे : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू असला, तरी या संघर्षाचा संस्थेच्या नियमित कामकाजावर कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही. संस्थेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या धम्म विचारांचा प्रसार करण्यावर सातत्याने भर देण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन डॉ. चंद्रबोधी पाटील यांनी दिली.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे राज्य उपाध्यक्ष सुरेश लोंढे, महाराष्ट्र अध्यक्ष के. के. बच्छाव, भंते शीलरत्नजी थेरो आदी उपस्थित होते.
डॉ. चंद्रबोधी पाटील यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना संस्थेमध्ये आमंत्रित करून त्यांना मानाचे स्थान देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर संस्थेसंदर्भात न्यायालयीन वाद निर्माण झाला आणि गेल्या ३५ वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहे. असे असले तरी संस्थेचे सामाजिक व धम्मविषयक कार्य महाराष्ट्रासह भारतातील २८ राज्यांमध्ये सातत्याने सुरू असून, संस्थेच्या उद्दिष्टांपासून कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही.
दरम्यान, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने शनिवारी, दि. २९ रोजी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात एकदिवसीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यात वरिष्ठांचा सत्कार समारंभ, पदाधिकाऱ्यांचा परिचय, मार्गदर्शन तसेच अध्यक्षांचे मनोगत आदी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


0 टिप्पण्या