कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव; राज्यातील नवनियुक्त जिल्हाप्रमुखांना अधिकृत नियुक्तीपत्रांचे वितरण
एल्गार मराठी न्यूज
धुळे : महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या वतीने ‘महाराष्ट्र कुस्ती गौरव महासन्मान सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य सोहळा २ ऑक्टोबर २०२६ रोजी कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन, कुस्तीपंढरी येथे होणार आहे.
कुस्तीगीरांच्या विविध समस्या सोडविणे, ग्रामीण व शहरी भागात कुस्तीचा प्रसार वाढविणे, भव्य कुस्ती स्पर्धा व मैदानांचे आयोजन करणे, आयोजकांना आर्थिक मदत व प्रोत्साहन देणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, तसेच सरकारी योजनांचा लाभ पैलवानांपर्यंत पोहोचविणे, या उद्दिष्टांसाठी संघटना कार्यरत राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे धुळे जिल्हाप्रमुख तथा धुळ्याचे प्रथम महापौर भगवान रामभाऊ करनकाळ (बापूजी) यांनी दिली.
या सोहळ्यात कुस्तीचा पोशिंदा पुरस्कार, महाराष्ट्र कुस्ती जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट वस्ताद, उत्कृष्ट युवा पैलवान, उत्कृष्ट युवा महिला पैलवान, उत्कृष्ट क्रीडा पत्रकार, उत्कृष्ट कुस्ती निवेदक, उत्कृष्ट कुस्ती प्रसारक आणि उत्कृष्ट कुस्ती संस्था अशा विविध पुरस्कारांनी कुस्ती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे.
याशिवाय महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांसह नवनियुक्त जिल्हाप्रमुखांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. त्यांचा कोल्हापुरी मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जाणार आहे.
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित ‘खाशाबा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रथमच प्रदर्शन हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण असणार आहे. चित्रपटाचे कलाकार, दिग्दर्शक, निर्माता आणि संपूर्ण टीम यावेळी उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दरम्यान, कुस्ती क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच होतकरू व गरजू पैलवानांना योग्य मार्गदर्शन, संधी आणि त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सक्षम, संघटित व कार्यक्षम संघटनात्मक यंत्रणा उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. कुस्ती क्षेत्रात निस्वार्थीपणे काम करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या लाल मातीतील कुस्ती परंपरा, कुस्ती संस्कृती आणि आयुष्यभर कुस्तीची सेवा करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणारा ऐतिहासिक सोहळा ठरणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील सर्व पैलवान, वस्ताद, प्रशिक्षक, आयोजक, क्रीडा पत्रकार, कुस्ती निवेदक, कुस्तीप्रेमी आणि मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हावे, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क :
भगवान रामभाऊ करनकाळ (बापूजी), जिल्हाप्रमुख, महाराष्ट्र कुस्ती संघटना, धुळे — मो. ९८२३१५४४४१
गोरख आप्पा पाटील, प्रवक्ते तथा सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक — मो. ८८०६१७३१६६


0 टिप्पण्या