खान्देशातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी
एल्गार मराठी न्यूज
धुळे, ता. २४ : धुळे शहरात किमान ३०० खाटांचे अत्याधुनिक शासकीय कॅन्सर सुपर स्पेशालिटी रुग्णालय व संशोधन केंद्र सुरू करावे, अशी आग्रही मागणी धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे केली. आरोग्यमंत्री आबीटकर धुळ्यात जिल्हा रुग्णालयातील महिला व बाल रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले असता आमदार अग्रवाल यांनी त्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
धुळे जिल्हा गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांसह जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेलगत आहे. राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गांचे जाळे असल्याने धुळे शहरात भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे आरोग्य केंद्र बनले आहे.
कॅन्सर उपचारांसाठी मुंबई-पुण्याकडे धाव
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या उपचारांसाठी मात्र रुग्णांना आजही मुंबई, पुणे किंवा अन्य मोठ्या शहरांकडे जावे लागते. सामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी वारंवार मोठ्या शहरांमध्ये जाऊन उपचार घेणे अत्यंत खर्चिक ठरते. त्यामुळे अनेक रुग्णांना आवश्यक उपचारांपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण होते, असे आमदार अग्रवाल यांनी निवेदनात नमूद केले.
३०० खाटांचे सुसज्ज कॅन्सर रुग्णालय उभारण्याची मागणी
धुळे येथे किमान ३०० खाटांचे सुसज्ज शासकीय कॅन्सर सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारावे. या रुग्णालयात कॅन्सर तपासणी व निदानासोबत अत्याधुनिक शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी, इम्युनोथेरपी, पीईटी-सीटी स्कॅन, एमआरआय, लिनियर एक्सिलरेटर तसेच आवश्यकतेनुसार बोन मॅरो ट्रान्सप्लांटसह आधुनिक उपचार सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
तातडीने सॅटेलाइट कॅन्सर केअर युनिट सुरू करा
कॅन्सर रुग्णालयाला मंजुरी मिळून त्याची उभारणी होईपर्यंत लागणारा कालावधी लक्षात घेता धुळ्यात तातडीने सॅटेलाइट कॅन्सर केअर युनिट सुरू करावे, अशीही मागणी करण्यात आली. टाटा मेमोरिअल सेंटर किंवा अन्य नामांकित कॅन्सर रुग्णालयांच्या तांत्रिक सहाय्याने कॅन्सर ओपीडी, डे-केअर केमोथेरपी, कॅन्सर स्क्रीनिंग आणि फॉलोअप सेवा सुरू करण्याची मागणी आमदार अग्रवाल यांनी केली.
कॅन्सर संशोधन व प्रशिक्षण केंद्राची संकल्पना
धुळे येथील प्रस्तावित कॅन्सर रुग्णालयाचे भविष्यात उत्तर महाराष्ट्र प्रादेशिक कॅन्सर केंद्रात रूपांतर करून कॅन्सर संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, असेही आमदार अग्रवाल यांनी सुचविले. नर्सिंग, पॅरामेडिकल आणि तांत्रिक मनुष्यबळासाठी प्रशिक्षण सुविधा सुरू कराव्यात. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून पात्र रुग्णांना जास्तीत जास्त उपचार मोफत उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
दूरवरून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सुसज्ज धर्मशाळा, अल्पदरात निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
जिल्ह्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका नेटवर्क
धुळे जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्गांसह विविध मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये जखमींना वेळेत उपचारपूर्व सेवा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी जिल्ह्यात गरजेनुसार विशेषीकृत आधुनिक रुग्णवाहिकांचे स्वतंत्र नेटवर्क उभारावे, अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी केली.
भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय तसेच धुळे जिल्हा रुग्णालयाला आधुनिक जीवनरक्षक उपकरणांनी सज्ज रुग्णवाहिका, प्रशिक्षित चालक आणि आवश्यक इंधन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली.
जिल्हा रुग्णालयाला डॉ. आनंदीबाई जोशींचे नाव द्या
भारताच्या वैद्यकीय इतिहासात महिलांसाठी नवा मार्ग निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र कन्या डॉ. आनंदीबाई जोशी यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा उचित सन्मान व्हावा यासाठी धुळे जिल्हा रुग्णालयाला भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई जोशी यांचे नाव द्यावे, अशी मागणी आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी केली.
रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अथवा प्रशस्त आवारात डॉ. आनंदीबाई जोशी यांचे भव्य स्मारक उभारावे, त्यांच्या जीवनकार्याची माहिती देणारे प्रेरणा केंद्र तथा स्मृती दालन सुरू करावे आणि वैद्यकीय शाखेतील गुणवंत विद्यार्थिनींसाठी ‘डॉ. आनंदीबाई जोशी वैद्यकीय प्रेरणा पुरस्कार’ सुरू करावा, अशा मागण्याही त्यांनी केल्या.


0 टिप्पण्या