SIR अभियानाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; मतदारांनी गांभीर्याने सहकार्य करावे : संजय कुसळकर

 


धुळे शहरातील विविध प्रभागांत शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागातर्फे जनजागृती व मार्गदर्शन शिबिर

एल्गार मराठी न्यूज 

धुळे, प्रतिनिधी दि. २८ जुलै : भारत निवडणूक आयोगामार्फत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) अभियानाच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेच्या विविध प्रभागांमध्ये शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागातर्फे विशेष मार्गदर्शन शिबिर व जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत मतदारांनी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) अभियान गांभीर्याने घेऊन आवश्यक कागदपत्रांसह वेळेत सहकार्य करावे, असे आवाहन शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे सोशल मीडिया राज्यप्रमुख संजय कुसळकर यांनी केले.

या बैठकीला प्रभागातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, स्वयंसेवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संजय कुसळकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध प्रभागांमध्ये हा जनजागृती कार्यक्रम पार पडला.

भारत निवडणूक आयोगाने ३० जून ते ८ ऑगस्ट या कालावधीत राज्यभर विशेष सखोल पुनरिक्षण अभियान सुरू केले असून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. काही ठिकाणी या अभियानाबाबत मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांना योग्य माहिती मिळावी, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे आणि प्रत्येक पात्र मतदाराची नोंद अचूक राहावी या उद्देशाने या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी संजय कुसळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. प्रत्येक पात्र मतदाराने आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज भरून निवडणूक आयोगाच्या अभियानास सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कुणाल कुसळकर यांनी मतदार नोंदणी व फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली. तसेच उपस्थित नागरिकांच्या विविध शंकांचे निरसनही करण्यात आले. बैठकीत इतर पदाधिकाऱ्यांनीही मतदार यादी अद्ययावत ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या